* मार्केटयार्ड, मंडईसह किराणा दुकाने ओसंडून
* सोशल डिस्टंन्सिग नियमांचा मात्र “बाजार’
* लॉकडाऊन किती दिवसांचे? संभ्रम कायम
* मध्यवर्ती भागांमध्ये ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा
पुणे- मंगळवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमुळे नागरिकांनी विविध खरेदीसाठी शनिवारी बाहेर पडण्यास सुरूवात केली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी तोबा गर्दी दिसून आली. यात मंडई, किराणा दुकाने, भुसार बाजाराला अक्षरश: जत्रेचे स्वरुप आले होते. जाहीर केलेले लॉकडाऊन 10 दिवसांचे असेल, असे सांगण्यात आले असले, तरी ते लांबणार का? या शक्यतेची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसून आले आहे. पण, या गर्दीने आपसूकच करोनाला आमंत्रण देण्यात आले.
गर्दी…कोंडी अन् बेशिस्त
पुणे – नागरिक दुचाकी आणि चारचाकी घेऊन बाहेर पडल्याने शनिवारी शहरातील वाहनांचे प्रमाण अधिक होते. अनेक ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग केल्यास कोंडी झाली होती. लॉकडाऊन होणार असल्याने खरेदी किंवा थकीत कामे पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन प्रवास करत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेकांनी सकाळीच बाजारपेठा गाठल्या. यामुळे मध्यवर्ती भागही जाम झाला. याशिवाय पेट्रोल पंप सुरू राहण्याबाबत संभ्रम असल्याने वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर देखील गर्दी केली होती.
रिक्षांच्याही रांगा नेहमी स्टेशन, बसस्टॅन्डच्या बाहेर पाहायला मिळणाऱ्या रांगा मोठी दुकाने, मॉल्सच्या बाहेर पाहायला मिळाल्या. नागरिक दुकानांतून साहित्य घेऊन बाहेर पडल्यानंतर रिक्षाचालकांची संबंधिताने आपल्याच रिक्षाच बसावे, यासाठी लगबग सुरू होती.
बेशिस्त पार्किंगची भर
भाजीपाला, किराणा अशा विविध दुकानांसह, बॅंका आदीमध्ये येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली होती. तर, काही ठिकाणी दुहेरी पार्किंग केले होते. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. काहींनी अरुंद रस्त्यांवर चारचाकी उभ्या केल्याने, वाहतुकीसाठी अरुंद जागा शिल्लक राहिली होती. याशिवाय काही ठिकाणी नागरिकांनी साहित्य गाडीमध्ये ठेवण्यासाठी रस्त्यात चारचाकी वाहने उभी केल्याने काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगदेखील उद्भवले.
मार्केटयार्डात “घाऊक’ गर्दी…
पुणे –शनिवारी सकाळपासून मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजार, शहरातील विविध भागातील मॉल, किराणा आणि फरसाणच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्याबरोबरच सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाला होता.
साठा मुबलक
मार्केट यार्डात किराणा दुकानदार आणि विक्रेत्यांपेक्षा किरकोळ अन्नधान्य आणि खरेदीसाठी आलेल्यांची संख्याच लक्षणीय होते. बाजार समितीच्या सॅनियटायझर, थर्मल स्कॅनरने तापमान मोजण्याच्या उपाययोजना गर्दीमुळे नावापुरत्याच राहिल्या. दरम्यान, “घाऊक बाजारात अन्नधान्य आणि किराण्याचा मुबलक साठा आहे,’ असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.
मॉल्ससह दुकानांसमोर रांगा
सदाशिव पेठेतील घाऊक औषध विक्रेते, रविवार पेठेतील बाजारात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नागरिकांनी केली. शहरातील मोठमोठ्या मॉलमध्ये ठराविक संख्येने नागरिकांना खरेदीसाठी सोडण्यात येत आहे.त्यामुळे मॉलसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बालाजीसह विविध किराणा दुकानातही हीच स्थिती होती. स्वीट होम, फरसाण दुकानात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी दिसून आले.
पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये भुसार विभाग सुरू होता. मात्र, आता तो बंद राहणार आहे. तीन दिवसांत जीवनावश्यक वस्तुची खरेदी करावी, अशा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार शनिवारी (दि.11) ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रविवारी (दि.12) आणि सोमवारी (दि.13) भुसार बाजाराचे कामकाज नियमित सुरू असेल.
नितीन रासकर, विभागप्रमुख, गूळ-भुसार विभाग.