पुणे – कारागृहातील शिपाई महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कारागृह अधिकारी योगेश भास्करराव पाटील (वय 52, रा. जेलर बंगला, कारागृह वसाहत, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.. याबाबत एका 39 वर्षाच्या महिला शिपायाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात शिपाई आहे. तर, योगेश पाटील याच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल होता. दरम्यान, दि.14 ऑगस्टच्या सकाळी संबंधित महिला घरी येत असताना पाटीलने तिला गाठले आणि तिला घेऊन तिच्या घरी गेला.
त्यावेळी अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला धक्का देऊन महिला आतील खोलीत जाऊन लपली. तिने आतून कडी लावून घेतली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पाटील याला अटक केली असून, पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.