स्वयंसेवी संस्थेमध्ये घडला प्रकार
पुणे : स्वयंसेवी संस्थेमध्ये २० वर्षीय विशेष मुलीवर बलात्कार करणाऱ्या ६० वर्षीय ‘केअर टेकर’ ला न्यायालयाने दणका दिला आहे. १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
शाम दिवाकर काकडे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत संस्थेच्या महिला अध्यक्षांनी हवेली पोलिसात फिर्याद दिली आहे. हवेली तालुक्यातील स्वयंसेवी संस्थेमध्ये जून २०१६ आणि त्यापूर्वीचा काही कालावधी आणि २० मार्च २०१७ या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी काम पाहिले. ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये संस्थेच्या महिला अध्यक्ष, विशेष मुलीच्या शाळेचे अध्यक्ष, महिला सामाजिक कार्यकर्त्या, तपासी अंमलदार आणि ससूनच्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
या संस्थेमध्ये दोन तरूणींसह नऊ महिला आहेत. तीन पुरूष आहेत. त्यापैकी काकडे हा केअर टेकर आहे. पीडितेला कामे सांगून आणि इतर प्रकारे त्रास दिला. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निवृत्त पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे आणि उपनिरीक्षक आर.के.वाईकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, पैरवी कर्मचारी हवालदार सचिन अडसुळ यांनी म्दत केली.
पीडितेची साक्ष नाही. मात्र, डीएनए रिपोर्ट ठरला महत्त्वाचा
या प्रकारानंतर पीडितेचे लग्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयात तिची साक्ष झाली नाही. मात्र, तिने बाळाला जन्म दिला आहे. डीएनए रिपोर्टवरून हे बाळ आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले. हा पुरावा शिक्षेसाठी महत्त्वाचा ठरल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी दिली.