टोरांटो :- आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत एक महाविक्रम साकार झाला. अमेरिका संघाने अर्जेन्टिनाचा तब्बल 450 धावांनी पराभव केला.
अमेरिका संघाने 50 षटकांत तब्बल 515 धावांचा डोंगर उभारला. त्यात भव्य मेता याने 91 चेंडूत 136 तर, कर्णधार ऋषी रमेश याने 59 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्यांना साथ देताना अर्जुन महेशने 44 चेंडूत 67 धावा फटकावल्या. प्रणव चेट्टीपलायमने 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या धावसंख्येचा सामना करताना अर्जेन्टिनाचा डाव 19.5 षटकांत अवघ्या 65 धावांवर संपूष्टात आला.
अर्जेंटिनाचे आठ फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. त्यांच्याकडून थिओ व्रुग्डेनहिलने 44 चेंडूत सर्वाधिक 18 धावा केल्या. अमेरिकेकडून अरिन नाडकर्णीने 6 षटकांत 21 धावा देत 6 बळी घेतले. आर्यन सतीशने दोन गडी बाद केले.
19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये अमेरिकेने ऑस्ट्रेलिया सर्वाधिक धावांच्या विजयी फरकाचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाने 2002 साली केनियाचा 430 धावांनी पराभव केला होता. 2022 साली भारताने युगांडावर 326 धावांनी विजय प्राप्त केला होता.
तसेच ऑस्ट्रेलियाने 2018 साली पापुआ न्यू गिनीचा 311 धावांनी तर त्याच साली श्रीलंकेने केनियाचा तेवढ्याच धावांच्या फरकाने पराभव केला होता. 2002 साली वेस्ट इंडिजने स्कॉटलंडवर 301 धावांनी मात केली होती.