पुणे: मद्यपी पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
चांदणी अमोल मोहिते (वय 30, रा. गणेश पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोल आणि दोन नातेवाईक महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला. चांदणी यांची बहीण सपना चव्हाण (वय 34,रा. नाना पेठ) यांनी यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमोल मद्यपी असून त्याला जुगार खेळण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून अमोल आणि त्याच्या नातेवाईकांनी चांदणीला स्वयंपाक नीट करत नाही, असे टोमणे मारण्यास सुरुवात केली.
महिन्याभराचे दूधबील तसेच वीजबील न भरल्याने तिला बोलण्यात आले. पतीने मद्यासाठी पैसे मागितल्याने चांदणी नैराश्यात होती. तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर चांदणीच्या बहिणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत चांदणीचा छळ होत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हटले. या प्रकरणाची शहानिशा करून पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत.