आतापर्यंत 27 हून अधिक जणांना लागण : दोघांचा मृत्यू
पुणे: शहरात सर्वप्रथम मध्य वस्तीतील एका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. या पोलीस ठाण्यातील 8 कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याच पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकाच इमारतीत एकाच मजल्यावर असलेल्या दुसऱ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यांनी आमच्या सर्वांची करोना चाचणी घ्यावी, अशी मागणी केली होती.
मात्र, करोनाचे जे निकष आहेत, त्यामध्ये हे बसत नसल्याचे सांगून त्यांची चाचणीची मागणी फेटाळली होती. त्यामुळे निवृत्तीकडे झुकलेले अधिकारी आणि कर्मचारी मनातून घाबरले असले तरी आदेशामुळे कामावर येत होते. आता या पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनाच लक्षणे दिसू लागल्याने त्यांची करोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले 40 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले आहे. त्यांची तपासणी होणार आहे.
पुणे शहर पोलीस दलातील 27 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.