#WIWvINDW 5th T20 : भारतीय महिला संघाचा विंडीजला ‘व्हाईट वाॅश

प्रोविडेंस (गयाना) : भारतीय महिला संघाने मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा ६१ धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह भारताने मालिका ५-० ने जिंकत विंडिजला ‘व्हाईट वाॅश’ दिला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १३४ धावांचे आव्हान विंडिजसमोर ठेवले होते, पण विजयासाठी १३५ धावांचा पाठलाग करताना विंडिजच्या संघाला २० षटकात ७ बाद ७३ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. भारताकडून फलंदाजीत नाबाद ५७ धावांची खेळी करणा-या वेदा कृष्णमूर्ति हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १३४ धावा केल्या. वेदा कृष्णमूर्तिने नाबाद ५७ आणि जेमिमा रोड्रिगेजने ५० धावांची खेळी केली. दोघींनी तिस-या विकेटसाठी ११७ धावा जोडल्या. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली होती. भारताच्या चौथ्या षटकात १७ धावांवर २ विकेट पडल्या होत्या. शेफाली वर्मा ९ तर कर्णधार स्मृति मंधाना ७ धावांवर बाद झाली, मात्र वेदा आणि जेमिमा या जोडीने भारताचा डाव सावरला.

वेस्ट इंडिजच्या संघास २० षटकात ७ बाद ७३ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. विंडीजची अर्धा संघ केवळ ५३ धावांवर माघारी परतला होता. भारताकडून अनूजा पाटील हिने ३ धावा देत २ विकेट घेतल्या तर राधा यादव, पूनम यादव, पूजा वस्ञकार आणि हरलीन दयोल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. वेस्ट इंडिजकडून केशोनाना नाइटने सर्वाधिक २२ तर शेरमाइन कैंपबेलने नाबाद १९ धावा केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.