बॉलीवूडमधील काही कलाकार सदोदित लाईमलाईटमध्ये नसले आणि त्यांच्या खात्यावर सुपरहिट चित्रपटांची भली मोठ्ठी नामावली नोंदवली गेलेली नसली तरी त्यांनी सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळेपण जपत एक स्थान निश्चित केले आहे. जॉन अब्राहम हा यापैकीच एक. आपल्या भारदस्त शरीरयष्टीमुळे, स्टायलिशपणामुळे आणि अभिनयामुळे तरुण-तरुणींचा लाडका बनलेला जॉन लवकरच काही गंभीर भूमिका साकारताना दिसणार आहे.
जॉनला सध्या त्याच्या आगामी “सत्यमेव जयते 2′ आणि “मुंबई सागा’ या चित्रटांची प्रतीक्षा आहे. याखेरीज जॉन लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जॉन मोहित सुरीच्या आगामी “व्हिलेन 2′ या चित्रपटात काम करणार असल्याचे समजते. वास्तविक, मोहित सुरीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांना घेऊन “व्हिलेन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
पण आता “व्हिलेन 2’मध्ये जॉन आणि आदित्य ही जोडगोळी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि भूषण कुमार करणार आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट “एक व्हिलेन’चा सिक्वेल नसणार आहे. जॉन आणि आदित्य दोघांनीही मोहित सुरीकडून चित्रपटाची कहाणी समजून घेतली आणि लागलीच होकार दिल्याचे समजते. दोघेही या चित्रपटाबाबत एक्सायटेड आहेत म्हणे !