दोन महिन्यांत चार घटना
पुणे – शहरातील वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांवर नागरिकांनी कचरा टाकू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने 24 तास खडा पहारा ठेवला आहे. त्यासाठी 3 शिफ्टमध्ये स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले असून गेल्या दोन महिन्यांत चार कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.
नागरिकांना विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच मारहण केली जात आहे. त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाय करावेत, तसेच सफाई कामगारांना सात तासांपेक्षा अधिक काम देऊ नये, अशी मागणी पुणे महापालिका कामगार युनियनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, 2 जानेवारी रोजी आप्पा बळवंत चौक परिसरात हमालवाडा पार्किंग येथे रात्रीच्या वेळेस कचरा टाकण्यास मनाई केल्याने कर्मचारी तानाजी देवकुळे यांना सहा ते सात जणांनी मारहाण केली आहे. त्यात देवकुठे यांना गंभीर इजा झाली असून या प्रकरणी महापालिकेने पोलिसांत तक्रार दिल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महापालिका प्रशासनाकडून देशातील स्वच्छ शहरात पालिकेचा प्रथम क्रमांक येण्यासाठी वेगवेगळया उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पालिकेने कर्मचाऱ्यांकडील कामाच्या जबाबदाऱ्या वाढविल्या आहेत. तर हे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कचरा संकलन, स्वच्छतागृहांची स्वच्छता तसेच क्रॉनिक स्पॉट कमी करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या नागरिकांशी तसेच सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांशी पालिकेच्या सेवकांचे वाद होत आहेत.