प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -पाच दिवसांच्या गणरायाचे आज (रविवारी) विसर्जन करण्यात आले. महापालिकेने सज्ज केलेल्या हौदांमध्ये, मूर्ती संकलन केंद्रात तर काहींनी नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन केले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असे म्हणत काही कुटुंबियांनी पाच दिवस बाप्पांची सेवा करून “पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत त्यांना दही पोह्यांची शिदोरी बांधून निरोप दिला. दुपारी गणेशाची विधीवत पूजा केल्यानंतर सायंकाळी बाप्पांना निरोप देण्यात आला.
महापालिकेने सुमारे 303 ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन, संकलन यांची सोय केली आहे. याशिवाय फिरत्या हौदांचीही सोय केली आहे. फिरते हौद कोणत्या भागात, कोणत्या चौकात किती वाजता येतील याचे नियोजन महापालिकेने प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांकही जाहीर केला आहे. त्यामुळे बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी दुपारनंतर लोक बाहेर पडले. नदीपात्रात मूर्ती विसर्जन न करता अनेकांनी मूर्ती दान, कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन केले. काही कुटुंबांमध्ये घरातच बादलीत पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.