विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना व नदालचा संघर्षपूर्ण विजय

फेडररचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

विम्बल्डन – अव्वल यशाकरिता उत्सुक असलेल्या सेरेना विल्यम्स व रॅफेल नदाल यांना विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. माजी विजेत्या रॉजर फेडरर यानेही तिसरी फेरी गाठली. भारताच्या लिएंडर पेस याला मिश्रदुहेरीत पराभव पत्करावा लागला.

सेरेना हिने स्लोवेनियाच्या काजा जुवन हिचा 2-6, 6-2, 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये तिला परतीचे फटके व सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये तिला सूर सापडला. तेथून तिने पासिंग शॉट्‌स व वेगवान सर्व्हिस असा खेळ करीत विजयश्री खेचून आणली. चीनच्या शुई झेंग हिने 14 व्या मानांकित कॅरोलीन वोझ्नियाकी हिचा 6-4, 6-2 असा पराभव करीत सनसनाटी विजय नोंदविला. पेत्रा क्विटोवा हिने अपराजित्व राखताना फ्रान्सच्या क्रिस्तिना म्लॅदेनोविक हिच्यावर 7-5, 6-2 असा विजय मिळविला. स्थानिक खेळाडू योहाना कोन्ता हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोवा हिला 6-3, 6-4 असे पराभूत केले.

माजी विजेत्या नदाल याला ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओस याने कौतुकास्पद लढत दिली. नदाल याने हा सामना 6-3, 3-6, 7-6 (7-5), 7-6 (7-3) असा जिंकला. त्याने तिसऱ्या व चौथ्या सेटमधील टायब्रेकरमध्ये सुरेख खेळ करीत बिजयश्री खेचून आणली. फेडरर याने स्थानिक खेळाडू जॉय क्‍लार्क याचा 6-1, 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये क्‍लार्क याने चिवट झुंज दिली. मात्र, फेडरर याने अनुभवाच्या जोरावर त्याला नमविले.

कॅनडाच्या मिलोस राओनिक याने रोली ओपेल्का याचे आव्हान 7-6 (7-1), 6-2, 6-1 असे संपुष्टात आणले. ओपेल्का या 6 फूट 11 इंच उंचीच्या खेळाडूने आधीच्या सामन्यात स्टॅनिस्लास वॉवरिंक याला पराभवाचा धक्का दिला होता. केई निशिकोरी याने स्थानिक खेळाडू कॅमेरून नोरी याच्यावर 6-4, 6-4, 6-0 अशी मात केली. पेस व समंथा स्टोसूर यांना पहिल्याच फेरीत हार मानावी लागली. स्थानिक खेळाडू इव्हान हियॉट व एडेन सिल्वा यांनी त्यांना 6-4, 2-6, 6-4 असे हरविले.

Leave A Reply

Your email address will not be published.