बजेट- सर्वाधिक लांबीचे “मॅरेथॉन बजेट’

नवी दिल्ली : आज संसदेमध्ये सादर झालेले अर्थसंकल्पाचे भाषण हे सर्वाधिक लांबीचे भाषण होते. तब्बल 2 तास 17 मिनिटे त्यांचे भाषण चालले. या भाषणादरम्यान सिताराम यांनी पाणी पिण्यासाठीही उसंत घेतली नाही. भाषणादरम्यान तरतूदींच्या घोषणा होत असताना संसद सदस्यांनी अनेकवेळा बाके वाजवून आनंद व्यक्‍त केला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकवेळा सितारामन यांच्या भाषणावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया बाक वाजवून व्यक्‍त केली. ग्रामीण कारागीरांसाठीच्या तरतूदी जाहीर केल्यानंतर खासदारांकडून सर्वाधिक काळ बाक वाजवले गेले.

सितारामन संसदेमध्ये येताच काही खासदार महिलांनी त्यांच्याजवळ येऊन शुभेच्छा दिल्या. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये बसलेले आई-वडील आणि कन्या वाड्‌.मयी पारकला यांनाही सितारामन यांनी अभिवादन केले.

या एकाच भाषणामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी उर्दू, हिंदी, संस्कृती आणि तमिळ म्हणी, सुभाषिते आणि काव्यपंक्‍तीचा वापर केला होता. उर्दू शायर मन्झूर हाश्‍मी यांच्या शायरीने त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
“यकीन हो तो कोई रास्ता निकलता है,
हवा की ओत भी ले कर चिराग जलता है’
जर निर्धार पक्का असेल तर कोणत्याही विपरीत परिस्थितीवर मात करता येऊ शकेल, या अर्थाच्या या शेरमुळे त्यांचा आत्मविश्‍वासच दिसून आला.

अर्थसंकल्प सादर होताना सरकारच्या बाजूचे सर्व खासदार उपस्थित होते. मात्र विरोधकांच्या काही जगा रिकाम्या दिसत होत्या. मुलायम सिंह आणि अखिलेश यादव हे पिता पुत्रही अनुपस्थित होते. डी.राजा, कुमार केतकर, डॉ.नरेंद्र जाधव, के. अल्फोन्स, मजीद मेमन आणि स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेतील सदस्य प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये उपस्थित होते.
सभापती ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्पाच्या अखेरीस सितारामन यांचे कौतुक केले. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.