लंडन :- विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या मानांकित पेट्रा क्विटोव्हानेही आगेकूच करताना दुसरी फेरी गाठली. तिने पहिल्या फेरीच्या लढतीत इटलीच्या जस्मिन पाओलिनीचा 6-4, 6-7, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत रशियाच्या ऍना ब्लिंकोव्हाने बेल्जियमच्या यानिना विकमेयरवर 6-2, 4-6, 6-3 असा विजय मिळवला. फ्रान्सच्या एलीज कॉर्नेटनेही सनसनाटी निकाल नोंदवताना जपानच्या नाओ हाबीनोवर 6-2, 6-2 अशी मात केली. चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेझीकोव्हाने हेदर वॉटनसचा 6-2, 7-5 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत इटलीच्या जेन्नीक सिन्नरनेही आगेकूच करताना अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्तझमनचा 7-5, 6-1, 6-2 असा पराभव केला. स्पर्धेचा संभाव्य विजेता सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचनेही थाटात आगेकूच करताना ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर 6-3, 7-6, 7-5 अशी मात केली.
बल्गेरियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हने शो शिमाबुकुरूवर 6-1, 6-2, 6-1 अशी मात केली. अमेरिकेच्या फ्रान्सिस तौफूने चीनच्या वु यिबीनचा 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. चेक प्रजासत्ताकची स्टार खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोव्हाला या स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. पहिल्याच फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या नतालिजा स्तेव्हानोव्हीककडून प्लिस्कोव्हाला 6-2, 6-3 असे पराभूत केले.
आंदोलकांमुळे स्पर्धेला गालबोट…
जस्ट स्टॉप ऑईल असे फलक हाती घेतलेल्या काही आंदोलकांनी केलेल्या वर्तनामुळे स्पर्धेला गालबोट लागले. यातील दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती सामना सुरू असतानाच कोर्टवर घुसली व खाली बसून नारेबाजी करत होती. अखेर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले व त्यांनी कोर्टवर फेकलेल्या काही वस्तूही बाहेर काढल्या व कोर्ट साफ केले.
यानंतरच सामने पुन्हा सुरू झाले. आता मात्र, टेनिसपटूंनी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. असेच आंदोलन करण्याचा प्रयत्न इंग्लंडमध्येच सुरू असलेल्या ऍशेस कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यानही घडला होता. त्यावेळीही पोलिसांनी हस्तक्षेप करत कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही.