बार्बाडोस -भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोसला कसून सराव करत आहे. त्यातच एक अनोखी गोष्ट घडली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याऐवजी चक्क विराट कोहलीच संघाचा प्रशिक्षक बनला व त्याने संघातील युवा फलंदाजांना मोलाचे सल्ले दिले. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील फलंदाज नेटमध्ये सराव करत असताना द्रविडने कोहलीला पुढाकार घ्यायला लावला व या दोघांनी मिळून नवोदितांना सल्ले दिले. संघातील सर्व खेळाडू सध्या बीच व्हॉलीबॉल खेळत तंदुरुस्ती टिकवण्याचेही व्यायाम केले.
नेटमध्ये सराव करताना कोहलीने श्रीकर भरत, इशान किशनसह अन्य फलंदाजांना उसळत्या चेंडूवर कशी फलंदाजी करायची किंवा असे चेंडू कसे सुरक्षितपणे सोडून द्यायचे याचे प्रात्यक्षिकही दाखवले. या दोन संघातील पहिला कसोटी सामना येत्या 12 जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी भारतीय संघ दिवसातील दोन सत्रांत सराव करत आहे.
जयस्वालला खास गुरूमंत्र
सराव सुरू असताना यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना कोहली सातत्याने त्याच्याशी संवाद साधत होता. कोणत्या गोलंदाजाविरुद्ध कशी रणनीती अवलंबयाची तसेच कोणत्या चेंडूंवर मोठे फटके खेळायचे व कमीत कमी धोका पत्करून खेळी कशी उभारायची याचे धडेच कोहलीने जयस्वालला दिले. जयस्वालनेही सरावातील पहिले तीनही दिवस मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा कोहलीशीच जास्त संवाद साधला व त्याने सांगितल्याप्रमाणेच फलंदाजीचा सरावही केला.