ख्राइस्टचर्च -कर्णधार केन विल्यमसनचे दमदार द्विशतक, हेन्री निकोलसचे दीडशतक व डॅरेल मिचेलचे शतक यांच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात 6 बाद 659 असा धावांचा डोंगर उभा केला.
पहिल्या डावात 297 धावा करणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात मंगळवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 1 बाद 8 धावा केल्या आहेत. त्यांना डावाचा पराभव टाळण्यासाठी 355 धावांची आवश्यकता आहे.
सोमवारच्या 3 बाद 286 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर न्यूझीलंडने आक्रमक फलंदाजी केली. कर्णधार विल्यमसनने दमदार द्विशतकी खेळी केली. त्याने 238 धावांची खेळी करताना निकोलससह चौथ्या गड्यासाठी 369 धावांची विक्रमी भागीदारी केली. निकोलसनेही आपले दीडशतक साकार केले मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलनेही शतक फटकावले.
विल्यमसनने मिचेलच्या साथीत सहाव्या गड्यासाठी 133 धावांची भागीदारी केली. त्यानंतर तो बाद झाल्यावर मिचेलने काएल जेमिसनच्या साथीत अर्धशतकी भागीदारी करत संघाला साडेसहाशे धावांचा डोंगर उभारून दिला. पाकिस्तानकडून महंमद अब्बास, शाहिन आफ्रिदी व फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विल्यमसनने टाकले ब्रॅडमन यांनाही मागे
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने इतिहास घडवला आहे. सोमवारी शतक पूर्ण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमादित्य सुनिल गावसकर यांच्या 35 शतकांचा विक्रम मागे टाकला होता. मंगळवारी द्विशतकी खेळी करताना त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा 6 हजार 996 धावांचा विक्रम मागे टाकला. त्याने न्यूझीलंडकडून सर्वात जलद 7 हजार धावा करण्याची कामगिरी केली. ही कामगिरी आधी न्यूझीलंडच्या रॉस टेलरच्या नावावर होती.