ऍटलांटा – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्जिया प्रांतात जी मतमोजणी झाली आहे त्यात ज्यो बायडेन हे 12 हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आले असले तरी त्या प्रांताची फेरमतमोजणी केली जावी अशी मागणी ट्रम्प यांच्या निवडणूक समितीकडून करण्यात आली असून त्या मागणीचा विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रम्प यांच्या समितीचे प्रमुख डॉ कॉलिन्स आणि रिपब्लीकन पक्षाचे जॉर्जिया प्रांताचे अध्यक्ष डेव्हीड शफेर यांनी स्टेट सेक्रटरी ब्रॅड राफेन्सपर्जर यांना तसे पत्र पाठवले आहे. तेथील पन्नास लाख मत पत्रिकांची प्रत्यक्ष हाताने मजमजोणी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत घोळ केल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांच्या समर्थकांनी स्टेट सेक्रेटरींच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
तथापी त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला असून आम्ही अत्यंत पारदर्शीपणाने ही मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे असा खूलासा त्यांनी केला आहे. जॉर्जिया प्रांतात वारंवार निवडणूका होतात त्यामुळे आम्हाला येथे या प्रक्रियेचा चांगला अनुभव आहे.
त्यामुळे येथे काहीच विपरीत घडलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तेथील मतांची यांत्रिक मशीन्सद्वारे मतमोजणी झाली आहे पण हाताने ही मोजणी व्हावी अशी ट्रम्प समर्थकांनी केलेली मागणी मान्य केली जाण्याचीही शक्यता तेथे व्यक्त होत आहे.