नॅशनल हाय-वेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक आज होणार बैठक
वरवंड- पाटस (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर गेल्या आठवड्यात (दि. 10) नागरिकांनी दौंड तालुक्यातील सर्व वाहनधारकांना टोल फी वसुलीतून सूट देऊन टोल माफ करण्यात यावा, तसेच अन्य काही मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या टोलच्या प्रश्नावर उद्या (शुक्रवार, दि. 20) नॅशनल हाय-वेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील पाटस येथील टोल नाक्याचे जनसंपर्क अधिकारी वैभव चव्हाण यांनी दिली.
पाटस येथील टोलनाक्यावर गेल्या आठवड्यात (दि. 10) मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जमा झाले होते. यावेळी “एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांसोबत स्थानिक नागरिकांची टोल प्रश्नावर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. यानंतर सोमवारी (दि. 16) मोठ्या संख्येने नागरिक टोल नाक्यावर जमा झाले होते. यावेळी टोल नाका प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) नॅशनल हायवेचे अधिकारी टोल नाक्यावर उपस्थित राहणार आहेत. यावेळी चर्चा करण्यासाठी स्थानिकांनी उपस्थित राहावे, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंती टोल नाका व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आली होती. यामुळे आता उद्या स्थानिक नागरिक आणि नॅशनल हायवेचे अधिकारी यांची चर्चा होणार असून, या चर्चेत स्थानिकांच्या मागण्यांवर तोडगा निघणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बैठकीनंतर आंदोलन करायचे की आंदोलन स्थगित करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वसंत साळुंखे यांनी दिली.
- आंदोलकांच्या मागण्या :
पाटस टोल प्लाझावरून दौंड तालुक्यातील सर्व वाहनधारकांना टोल वसुलीतून सूट द्यावी. करारातील तरतूदीप्रमाणे मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूचा कि. मी.63.200 ते 65.300 दरम्यानचा सेवा रस्ता व उजव्या बाजूच्या मुख्य रस्त्याला लागून असलेला समांतर सेवा रस्ता कि. मी.40 ते 144.400 पर्यंतचा संपूर्ण रस्ता स्थानिक वाहनधरकांसाठी त्वरीत पूर्ण करून वाहनांसाठी खुला करून द्यावा. टोल प्लाझाच्या दक्षिण बाजूस असलेल्या कि. मी. 62 ते 65 दरम्यान असलेला सेवा रस्ता स्थानिक वाहनधारक नागरिकांना जाण्या-येण्यासाठी खुला करून द्यावा. पाटस टोल प्लाझा येथे दौंड तालुक्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.