बंगळुरू : येथील श्री पुट्याण्णा चेट्टी टाऊन हॉल जवळ प्रतिबंधात्मक आदेश मोडून शांततापूर्ण निदर्शने करताना प्रख्यात इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना अटक करण्यात आली. ही अटक थेट केंद्र सरकारकडून आलेल्या आदेशामुळे झाल्याचे वृत्त आयबीटाईम्स या संकेतस्थळाने दिले आहे.
हा 61 वर्षीय लेखक एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत असतानाच त्याला अटक करण्यात आली. त्यांना ताब्यात घेणे आले त्यावेळी हा इतिहासकार शांततापूर्ण निदर्शने करत होता. पोलिसांना त्यांना अटक करून नेताना सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. तसेच रुग्णवाहिकेची सोय केली होती. त्यांना बंगळुरूतील पोलिस मुख्यालयातील उपायुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले.
याबाबत आयबी टाइम्स या संकेत स्थळाने, सूत्रांच्या हवाल्याने गुहा यांच्या अटकेचे आदेश थेट केंद्र सरकारने दिले असल्याचे वृत्त दिले आहे. आपल्याला झालेली अटक ही पूर्णत: लोकशाही विरोधात आहे, असे गुहा यांनी म्हटले आहे. त्यांनी हातात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र घेतले होते. ते राज्य घटनेबाबत माध्यामांशी बोलत होते.
अटकेपुर्वी ते म्हणाले, घटनेच्या विरोधातील का कायदा आणि जमावबंदीच्या आदेशाविरूध्द हे आंदोलन आहे. महात्मा गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी असे प्रतिबंधात्मक आदेश ब्रिटिश देत असत, असे गुहा यांनी अटक होण्यापुर्वी माध्यमांना सांगितले.
रामचंद्र गुहा हे प्रख्यात इतिहासकार आहेत. पर्यावरण, सामाजिक, आर्थिक, राजकीय वाद हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अनेक नामांकित मासिके आणि शैक्षणिक नियतकालिकांत ते स्तंभलेखन करतात. गांधीपूर्व भारत आणि गांधींनंतरचा भारत यासह त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. भारतीय इतिहास संशोधकांत त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांना अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशनचा मानद परदेशी सदस्यत्व पुरस्काराने 2019मध्ये सन्मानित करण्यात आले होते.