मुंबई – महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप करत ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराचे दस्तावेज समोर आणले आहेत. दिवाळीपूर्वीच फडणवीस यांनी, ‘दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार’ असं म्हंटलं होत. अशातच फडणवीसांच्या आजच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी आपण उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलंय.
दरम्यान, फडणवीस यांनी लावलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपने ‘मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची पोस्ट करण्यात आली असून यामध्ये “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहेत.आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. या ट्विटसोबत भाजपने देवेंद्र का धमाका असा हॅशटॅग वापरला आहे.
देवेंद्रा फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “उद्या सकाळी (१० नोव्हेंबर) मी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब मुंबईत टाकेन आणि देशाला सांगेन की देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सर्व शहराला हॉस्टेज ठेवून होते. एक अंडरवर्ल्डचा म्होरक्या विदेशात बसून कसा मुंबईतून खंडणी उकळत होता आणि कुणासाठी तो काम करत होता.” असा दावा केल्याने उद्या ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.