सोलापूर – पतीने पत्नी व आपल्या मुलीच्या डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यात घडली आहे. लक्ष्मी अण्णा माने (वय 30) व श्रुती अण्णा माने (वय 12, दोघेही रा. भिलारवाडी, तालुका करमाळा,सोलापूर) असे खून झालेल्या आई व मुलीचे नाव आहे. अण्णा माने असे संशयित आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आण्णा माने, मयत लक्ष्मी माने व श्रृती माने, मुलगा रोहित माने व मृताची सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहण्यास आहेत. दोन्ही मृत व संशयित आरोपी आण्णा हे एका खोलीत झोपले होते. तर मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपले होते.
दरम्यान, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटारसायकलवरून निघून गेला असे मुलगा रोहित माने याने पाहिले होते. त्यानंतर घरातील एका खोलीत लक्ष्मी व श्रृती या दोघींचे मृतदेह थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. अण्णा माने यानेच हत्याराने अज्ञात कारणाने दोघींच्या डोक्यात मारून त्यांचा खून केल्याचा संशय आहे.
मृत लक्ष्मी यांचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी अण्णा मानेच्या विरोधात दोघींचा खून केल्याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी आरोपीच्या तपासासाठी तीन पोलीस पथकं पाठवली आहेत.