मुंबई – एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी देखील वेतन मिळालेले नाही. चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना केवळ बेसिक वेतन देण्यात आले आहे. मात्र त्यातीलही भत्ते थकित आहेत. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे पीएफ, विमा, घराचे हप्ते रखडलेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शिंदे सरकारबाबत तीव्र नाराजी आहे. वेतन मिळाले नाही तर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेले तर याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. दरम्यान, मागील वर्षी दोन महिन्यांहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. तीनपटीने तिकीट देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागला होता. दरम्यान, एसटी कामगारांच्या पगारासाठी दर महिन्याला 360 कोटी रुपयांची गरज असते. त्यापैकी सरकारकडून केवळ 100 कोटी रुपये येत आहेत. त्यामुळे सलग दोन महिन्यांत 520 कोटी रुपयांची तुट निर्माण झाली आहे.