आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ‘बांबू’ चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती.
ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे आपल्याला एका साध्या मुलाच्या भूमिकेत दिसतोय. जो प्रेमभंगाच्या काळात प्रत्येक मुलीला रडायला खांदा देतोय. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाहीए. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय.
आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडितचीही झलक दिसत आहे. आता तिची यात काय भूमिका आहे, हे २६ जानेवारीलाच कळेल. अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच आपल्याला शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही दिसत आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. ‘बांबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.