मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली होती. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर त्यांनी आपला गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा करत ठाकरेंना दणका दिला होता. अशातच शिंदे यांनी आता दसरा मेळाव्यावरही हक्क सांगितला असून शिंदेंच्या गटाचा मेळावा आज वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन खासदार व ५ आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आलाय. याबाबत आता शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील २ खासदार व ५ आमदार शिंदे गटात येणार असल्याच्या दाव्यांबाबत विचारले असता माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी, ‘अगोदर पेपर फोडणार नाही, पण शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे मोठा धमाका करतील,एकनाथ शिंद धमाके करण्यासाठीच ओळखले जातात,’ असे म्हटले आहे.
“राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेंसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे”, असा दावा करत शिंदे गटाचे नेते तुमाने यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, शिवसेनेने देखील याबाबत प्रतिक्रिया दिली असून ‘उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही कोणत्याही आमदार-खासदार अथवा पदाधिकाऱ्यास शिवसेनेतून बाहेर जाण्यापासून रोखले नाही. ज्यांना ठाकरे यांच्यासोबत राहायचे आहे ते राहतील’ असे सांगण्यात आले.