मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (बुधवारी) बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
शरद पवार यांना यावेळी पत्रकारांनी काँग्रेस पक्ष भाजपविरोधी आघाडीचा घटक असेल का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पवार यांनी, ‘काँग्रेस असो अथवा इतर कोणता पक्ष असो जर ते भाजपविरोधात लढण्यास तयार असतील तर त्यांचे स्वागत आहे.’ असं उत्तर दिल.
पवार-बॅनर्जी यांची भेट २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला मजबूत पर्याय देण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल मानलं जातंय. मुंबईत दाखल झाल्यानंतर मंगळवारी बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपसमोर सक्षम पर्याय उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवू पाहणाऱ्या भाजपला ममता बॅनर्जी यांनी रोखलं होत. विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानंतर देखील ममतांनी राज्यात बहुमतासह सत्ता राखली. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये पायाला दुखापत झाल्याने व्हील चेअरवर बसून प्रचार करणाऱ्या ममतांनी, ‘एका पायावर बंगाल तर दोन्ही पायावर देश जिंकणार’ अशी गर्जना केली होती.
बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर ममतांनी आता आपला मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. मात्र तृणमूल राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असल्याचा फटका काँग्रेसला बसत असल्याचं दिसतंय. नुकत्याच मेघालयात झालेल्या राजकीय उलथापालथीत काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.