कुडाळ -जावळी तालुक्यातील बेलावडे येथील 65 वर्षांच्या वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाल्याने या गावासह कुडाळ परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या हाय रिस्क कॉंन्टॅक्टमधील 17 जणांना जावळी तालुक्यातील रायगाव येथील करोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. संपर्कात आलेल्यांची संख्या जास्त असल्याने आता बेलावडे गाव जावळी तालुक्यातील नवा हॉटस्पॉट ठरणार का, अशी भीती परिसरात निर्माण झाली आहे.
यासंदर्भात तहसीलदार शरद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षांचा करोनाबाधित वृद्ध, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात असे सहा जण दि. 19 रोजी मुंबईतून एकाच गाडीतून बेलावडे येथे आपल्या मूळ गावी आले. या वृद्धाला आधीच अर्धांगवायू झाला होता. गावी आल्यानंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यूपाश्चात या वृद्धाची करोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती समजताच गावातील नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली.
हे कुटुंब गावी आल्यानंतर या वृद्धाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काही लोकही त्याच्या घरी गेले होते, असे सांगण्यात येत आहे. या वृद्धाच्या संपर्कात आलेल्या 17 हाय रिस्क लोकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या सर्वांच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.