अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे गुण देणार
पुणे – राज्य शासनाने पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष वगळता अन्य सत्रांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यांचे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) व कुलगुरूंच्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्ष वगळता अन्य वर्षाच्या विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या व यंदाच्या गुणांवरून अतंर्गत मूल्यमापन करून पुढील वर्षात प्रवेश घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने त्या संदर्भातील प्रस्ताव मान्य करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठवला.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात शासनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षांच्या निकालासाठी महाविद्यालय स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मार्चमध्ये पुणे विद्यापीठाने पदवीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यात प्रथम व द्वितीय वर्षांचे काही विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत. तर काही विषय शिल्लक आहेत. ज्या विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्या उत्तरपत्रिका जमा असून, अद्याप पेपर तपासणी झालेली नाही. त्यामुळे हे पेपर महाविद्यालयात परत पाठवून प्राध्यापकांकडून तपासून घ्यावे लागणार आहेत. तसेच “रेड झोन’मध्ये ही काय करायचे, यावर चर्चा झाली. पुढील एक-दोन दिवसांत निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.