अहमदाबाद – दिल्लीनंतर पूर्ण राज्याचा दर्जा असलेल्या पंजाबमध्ये सत्तास्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातकडे आगेकूच केली आहे. यात ‘आप’ला बऱ्यापैकी यश येण्याची शक्यता व्यक्त होत असून ‘आप’ने गुजरातमध्ये किती जागा मिळतील याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
‘आप’चे राज्य प्रभारी डॉ. पाठक म्हणाले, “आमच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला गुजरातमध्ये आम आदमी पक्ष 58 जागा जिंकू शकतो. गुजरातच्या ग्रामीण भागातील जनता आम्हाला मतदान करणार आहे. शहरी भागातील निम्न आणि मध्यमवर्गीयांना बदल हवा असून ते देखील आम्हाला मतदान करतील.
डॉ. पाठक म्हणाले की, सर्वेक्षण पक्षाच्याच एजन्सीमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागातील काँग्रेसचे मतदार आणि शहरी भागातील कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय मतदारांची मते पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
पाठक म्हणाले, “ग्रामीण गुजरातमधील लोकांच्या मते काँग्रेस भाजपला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसचे मतदार आम्हाला मतदान करणार आहेत. सध्याची स्थिती अशी असून जसजसा वेळ जाईल आणि निवडणुका जवळ येतील आमच्या जागांमध्ये वाढ होईल.
शिवाय भाजप सरकारनं राज्यात केलेल्या सर्वेक्षणातून देखील ‘आप’ला 55 जागा मिळतील अशी आकडेवारी समोर आल्याचा दावाही डॉ. पाठक यांनी केला आहे.