मंचर – पारगांव (ता. आंबेगाव) येथील बाबु बन्सी बढेकर यांना पत्नी सुमित्रा हिने तिच्या माहेरच्या लोकांच्या मदतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. घोडेगाव न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बाबु बन्सी बढेकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. 3) पत्नीसह इतर पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगांव येथे 25 जून 2019 ला रात्री बाबु बन्सी बढेकर आणि त्यांची पत्नी सुमित्रा बढेकर यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणाचा राग मनात धरून पत्नी सुमित्रा हिने अमोल करंडे,राहुल भुरके (रा. काठापूर बुद्रुक), सुरज शिवले, तुषार शिवले (रा. वढु बुद्रुक), दिलीप भोर (रा. रांजणी) यांना फोन करून बोलावू घेतले. त्यांनी बाबु बढेकर यांच्या घरात घुसून त्यांना शिविगाळ, दमदाटी करून काठीने मारहाण केली.याबरोबरच दिलीप भोर याने 24 ऑक्टोबर 2010 ला दुपारी भांडणे मिटवण्यासाठी बाबु बढेकर यांना बोलावले.
यावेळी दिलीप भोर यांनी बाबु बढेकर यांना शिविगाळ, दमदाटी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यावेळी बाबु बन्सी बढेकर यांनी पोलिसांकडे या आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती; परंतु आरोपींवर कारवाई न झाल्याने घोडेगाव येथील न्यायालयात आरोपींच्या विरोधात फौजदारी दावा बाबु बढेकर यांनी दाखल केला होता.त्यानुसार आरोपींवर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने नुकतेच दिल्याने मंचर पोलीस ठाण्यात बाबु बढेकर यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सागर गायकवाड करीत आहे.