अर्थमंत्री अजित पवार विधीमंडळात सादर करणार अर्थसंकल्प
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अर्थराज्यमंत्री शंभुराजे देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडतील.
दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केलं. याआधी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. आता ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडतील.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे त्याकडे सगळ्यांच्याच लक्षं आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर तर कर्जाचा बोजाही वाढला
सरकारने दिलेल्या किती आश्वासनांची, घोषणांची अंमलबजणावणी होणार हे देखील आजच्या अर्थसंकल्पातून समोर येईल. तसंच शेतकरी, गृहिणींच्या विशेषत: शहरातील महिलांना सरकारकडून अपेक्षा आहेत. सार्वजनिक वाहतूक फ्री करावी, महागाई कमी करावी, सुरक्षितता वाढवावी अशा अनेक मागण्या महिलांनी केल्या आहेत. यासोबतच करदाते आणि उद्योजकांना नवीन काय मिळणार? हे देखील पाहावं लागेल. मंदीची स्थिती, घटणारा विकासदर हे आव्हान अजित पवारांसमोर आहे.