सिंहगडरस्ता –विनापरवानाधारक रिक्षा चालकांकडून आरटीओ नियम मोडण्याबरोबरच महिला प्रवाशांच्या छेडछेडीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
पुणे शहर तसेच उपनगरांतून धावणाऱ्या रिक्षांमध्ये सध्या नवी “फॅशन’ सुरू झाली आहे. आतील बाजूस दोन मोठे आरसे बसविले जात आहेत. या आरशातून मागील वाहने दिसण्यापेक्षा मागे बसलेल्या प्रवाशांचीच प्रतिमा अधिक प्रमाणात चालकास दिसत असते. मागील बाजूस महिला प्रवासी असतील तर त्यांना या प्रकाराचा त्रास होत आहे. अशा रिक्षामध्ये बसल्यानंतर बहुतांशी प्रवासी महिला विचीत्र अनुभव आले आहेत.
वाहनांना आरसे किती असावेत, ते कोठे असावेत याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहन उत्पादकांना नियम ठरवून दिलेले आहेत. काही विनापरवना रिक्षा चालक हे सर्व नियम मोडीत काढून मनमानी पद्धतीने आतील बाजूस आरसे बसवित आहेत, ही बाब नियमात नसल्याने वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होऊ लागली आहे.
याबाबत महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे काही महिलांनी सांगितले. तर, याबाबत काही विनापरवानाधारक रिक्षाचालकांशी चर्चा केली असता सर्वच चालक अशा वृत्तीचे नाहीत, काहींनी मागील वाहन पाहण्यासाठी आतील बाजूसही आरसे लावले असल्याचे सांगण्यात आले.
प्रादेशीक परिवहन कार्यालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय वाहनांत कोणतेही बदल करू नयेत. रिक्षा चालकांनीही आरसे लावताना नियमांत लावावेत. महिलांनी तक्रार केल्यास अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल. – उदयसिंह शिंगाडे, पोलीस निरीक्षक, वडगाव वाहतूक शाखा