नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आज दिल्लीकरांनी मतदान केले असून राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत थांबावे लागणार आहे. दरम्यान, दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला असला तरी त्यांचा मुलगा पुलकित याचे याबाबतचे मत थोडेसे वेगळे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केजरीवाल यांनी आज आपल्या पत्नी सुनिता आणि मुलगा पुलकित यांच्या समवेत सिव्हील लाईन्स भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला मात्र पुलकितला हाच प्रश्न विचारल्यानंतर त्याने निकालाचा चेंडू जनतेच्या कोर्टात ढकलला.
त्याचं झालं असं की, आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या पुलकितला पत्रकारांनी पुढील मुख्यमंत्री कोण होणार असा क्लिष्ट प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाचे, ‘लोक ज्याला निवडून देतील तो दिल्लीचा मुख्यमंत्री होईल.’ असं परिपक्व उत्तर पुलकितने दिलं.