Kalyan Banerjee: उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची संसदेच्या संकुलात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी नक्कल केली होती. यावरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर जगदीप धनखड यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यातच आता कल्याण बॅनर्जी यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल मंगळवारी कल्याण बॅनर्जी यांच्यासह १४१ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आलं आहे. कल्याण बॅनर्जी हे संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती यांची खिल्ली उडवताना दिसले. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी व्हिडिओ शूट देखील केला होता. यावरुन आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता यावर
कल्याण बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला जगदीप धनखड यांच्याबाबत खूप आदर आहे. ते आमच्या राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ते आपले उपराष्ट्रपती आहेत. मी केवळ एक कला सादर केली होती. पंतप्रधान मोदी यांनी देखील भूतकाळात लोकसभेमध्ये नक्कल केली आहे. मी तुम्हाला ते दाखवू शकतो. सगळ्यांनी ते खेळीमेळीत घेतलं होतं. आम्ही ते गांभीर्याने घेतले नव्हते,” असं कल्याण बॅनर्जी म्हणाले. यावेळी बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मात्र जगदीप धनखड यांच्या मिमिक्रिमुळे चर्चेत आलेले कल्याण बॅनर्जी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
कोण आहेत कल्याण बॅनर्जी?
कल्याण बॅनर्जी यांचा जन्म पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे झाला. त्यांनी एलएलबीचं शिक्षण असून ते पक्षाचे खटले प्रामुख्याने लढतात बॅनर्जी यांचे वडील भोलानाथ बॅनर्जी आणि आई सिबानी बॅनर्जी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव छबी बॅनर्जी असून त्यांना दोन मुले आहेत. कल्याण बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील बड्या वकिलांमध्ये गणले जातात आणि ते मुख्यतः तृणमूल काँग्रेसचे खटले लढतात. बॅनर्जी 1981 पासून कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. कल्याण बॅनर्जी हे सेरामपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या तिकिटावर विजय मिळवला आणि 2019 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाराजी व्यक्त
दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संसद परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले,” अशी माहिती उपराष्ट्रपतींनी ‘एक्स’ हँडलवरून दिली.