प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ई-वाहनांच्या विक्रीत दुपट्टीने वाढ झाली आहे. पहिल्या सहा महिन्यांत 6 हजार 702 वाहनांची नोंद पुणे परिवहन विभागाच्या कार्यालयात झाली आहे. पुणे जिल्ह्यात 21 हजारांहून अधिक ई-वाहने रस्त्यावर धावत आहेत. शहरात ई-वाहनांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत चार्जिंग स्टेशनची संख्या मात्र वाढलेली नाही. पुणे जिल्ह्यात केवळ 67 चार्जिंग स्टेशनची नोंद महावितरण कार्यालयात झाली आहे. यातील पुणे शहरात 37, पिंपरी-चिंचवड शहरात 19 आणि ग्रामीण भागात 11 चार्जिंग स्टेशन आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने नागरिंकानी सीएनजी गाड्या खरेदी केल्या. आता, सीएनजीचे दरही वाढत असल्याने नागरिक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळले आहे. पर्यावरण पुरक म्हणूनही इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहिले जाते. मेन्टन्स कमी, घरीच चार्जिंग करता येते तसेच पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत खर्चही कमी असल्यानेही ई-वाहन खरेदीकडे कल वाढलेला आहे.
ई-वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु, ई-वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी शासनाने प्राधान्य देणे गरजेचे ठरत आहे. ई-वाहन चालकांना लांब पल्ल्याच्या मार्गावर जाताना बऱ्याच वेळा चार्जिंगची समस्या निर्माण होत आहे तसेच वाहतूक कोंडीमुळेही चार्जिंग समस्या निर्माण होत असल्याने शहरातील महत्वाच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे.