पिरंगुट, दि. 12 (प्रतिनिधी) -मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ज्ञानरथाचे सारथीच नसल्याचे दयनीय चित्र आहे. गटशिक्षणाधिकारी पद गेली चार महिन्यांपासून रिक्त आहे. चारपैकी फक्त दोनच विस्तार अधिकारी कार्यरत असून केंद्रप्रमुखाच्या तब्बल 14 आणि मुख्याध्यापकांच्या 15 जागा रिक्त आहेत. एकीकडे विविध पदांच्या अनेक जागा रिक्त असताना दुसरीकडे अतिरिक्त कारभाराने काही शिक्षक मानसिक दडपणाखाली आल्याची दयनीय अवस्था मुळशीच्या शिक्षण विभागात पहावयास मिळत आहे.
मार्च महिन्यात येथील गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर पदोन्नती झाली. त्यांच्या जागी रिक्त झालेल्या जागेवर वेल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे यांना जादा पदभार देण्यात आला. त्यांच्या रजा कालावधीत मुळशीचे विस्तार अधिकारी प्रताप सुतार यांनी पंधरा दिवस कामकाज पाहिले. सध्या जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी नसल्याने तालुक्याच्या शैक्षणिक विकासाची गती थांबली आहे. शिक्षकांचे विविध प्रस्ताव पाठविण्यात विलंब होत आहे.
मुख्याध्यापकाची तालुक्यात 21 पदे मंजूर आहेत. सध्या फक्त सहा मुख्याध्यापक कार्यरत असून पंधरा जागा रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांच्या तालुक्यात 135 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 31 जागा रिक्त आहेत. तर उपशिक्षकांच्या मंजूर 675 जागांपैकी 72 जागांवर अद्याप शिक्षक नियुक्त केले गेले नाहीत. तालुक्यातील काही पदवीधर शिक्षकांना शाळांच्या प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सोपविली आहे. तर काही प्रभारी मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचेही अतिरिक्त काम करण्याचे आदेश दिले गेले आहेत. प्रभारी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांना जबाबदाऱ्या पार पाडताना कसरत करावी लागत आहे.