पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे 85 ते 90 टक्के विलगीकरण होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून गेला जात आहे. तर 2 ऑक्टोबरपर्यंत शहरात 100 टक्के विलगीकरण करण्यास यश येईल, असा आशावाद अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केला. तसेच शहरात घोषित व अघोषित अशा 71 झोपडपट्या आहेत. या सर्व झोपडपट्यांमध्ये झिरो वेस्ट राबविण्याचा पालिकेचा संकल्प असल्याचेही ढाकणे म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. शहरातील मिळकतींची संख्या, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याची समस्याही निर्माण होऊ लागली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहर स्वच्छतेवर, जनजागृतीवर मोठा भर दिला आहे. यासाठी आत्तापर्यत कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
शहरात दररोज 1100 टन कचरा निर्माण होत आहे. पालिकेच्या वतीने 450 घंटागाडीमार्फत शहरातील विविध भागातील कचरा गोळा केला जात आहे. हा कचरा मोशी येथील कचरा डेपोमध्ये डंपिंग केला जातो. कचरा कुंडीमुक्त शहर महापालिकेने संकल्पना राबविली आहे. मात्र, 70 ठिकाणे कचरा टाकण्याचे स्पॉट आहेत. महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी मोठी जनजागृती मोहिम राबविली. त्यासाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक केली.
त्यामुळे शहरात सध्यस्थितीत 85 ते 90 टक्के कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येत असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी केला आहे. तसेच येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत शहरात ओला आणि सुका कचऱ्याचे 100 टक्के विलगीकरण करण्यात पालिकेला यश येईल, असेही ढाकणे यांनी म्हटले आहे. मात्र, असे असले तरी शहराच्या विविध भागातील नागरिक आजही ओला, सुका कचरा एकत्रच देत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेचा दावा कसा पोकळ आहे, हे यावरून दिसून येत आहे.
गवळीमाथा येथील झोपडपट्टीत झिरो वेस्ट राबविणार
शहरात घोषित व अघोषित 71 झोपडपट्या आहेत. या सर्व झोपडपट्या झिरो वेस्ट करण्याचा महापालिकेने संकल्प केला आहे. याची सुरुवात भोसरीतील गवळीमाथा येथील झोपडपट्टीतून दि. 15 ऑगस्ट रोजी केली जाणार आहे. झोपडपट्टीतील ओला व सुका कचरा गोळा करून त्याच ठिकाणी झिरवण्याचा पालिकेचा मानस आहे. यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बचत गटांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.
नवी दिशा अंतर्गत स्वच्छतागृह चालविण्यास देणार
नवी दिशा या योजनेअंतर्गत पालिकेच्या वतीने भोसरीतील सार्वजनिक स्वच्छतागृह महिला बचत गटाला चालविण्यास देण्यात आले आहे. याच धर्तीवर शहरातील विविध भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे महिला बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.