नवी दिल्ली – दिल्ली जल बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना, राष्ट्रीय राजधानीतील 15 व्या शतकातील ऐतिहासिक स्मारक पाडून अधिकृत निवासस्थान बांधल्याप्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी उदित प्रकाश राय यांना केंद्रिय गृहमंत्रालयाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
गृह मंत्रालयाने आणखी एका आदेशात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध पदांवर तैनात असलेले भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी बसंत रथ यांचे निलंबन आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार उदित प्रकाश राय यांच्यावर विभागीय कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. निलंबनाच्या काळात, राय, 2007 एजीएमयुटी संवर्ग अधिकारी, यांचे मुख्यालय मिझोराम येथे असेल आणि सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय ते मुख्यालय सोडणार नाहीत.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दोन भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये कार्यकारी अभियंत्याला ‘अवाजवी फायदा’ देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली राय यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला राय यांना दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाने अधिकृत निवासस्थान बांधण्यासाठी ‘ऐतिहासिक महाल’ पाडल्याबद्दल नोटीस बजावली होती.
दुसरीकडे, वर्ष 2000 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी बसंत रथ यांनी, न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांच्या वरिष्ठांची अवज्ञा दाखवल्याबद्दल जुलै 2020 मध्ये निलंबित करण्यात आले. ते एजीएमयूटी कॅडरचे अधिकारी आहेत. रथ 31 जुलै 2023 पासून 180 दिवसांच्या अतिरिक्त कालावधीसाठी निलंबित राहतील. या दोन्ही निलंबन कारवायांना राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याचे समजते.