दादर – दादरमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Swimming Pool) एका मगरीचे पिल्लू (crocodile) आढळल्याने एकच खळबळ उडाली. या मगरीने एका व्यक्तीला चावा घेतल्याची बातमी सुद्धा समोर आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही मगर नेमकी स्विमिंग पुलमध्ये आली तरी कशी असा सवाल निर्माण होऊ लागला होता. त्यानंतर ही मगर शेजारील स्विमिंग पुलच्या बाजूला असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. ती शंका आता खरी ठरली आहे. ही मगर येथे आली तरी कशी याचे पुरावे समोर आले आहेत.
जलतरण तलावात आलेलं मगरीचं पिल्लू शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झाले आहे. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासन संबंधित प्राणीसंग्रहालयावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. याप्रकरणी आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
इतकेच काय तर, हे प्राणीसंग्रहालय नसून प्राणी तस्करीचा अड्डा असल्याचा आरोपही मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे शेअर केले आहेत. ‘हा घ्या पुरावा. मगर ही बाजूच्या प्राणी संग्रालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करी चा अड्डा,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
हा घ्या पुरावा.मगर ही बाजूच्या प्राणी संग्रालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करी चा अड्डा. pic.twitter.com/vZBjlauquJ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 5, 2023
नेमकं काय घडले?
दोन दिवसांपूर्वी मंगळवारी स्विमिंग पुलची पाहणी केली जात असताना एक मगरीचे पिल्लू कर्मचाऱ्यांना आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर तातडीने मगर पकणाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी अथक प्रयत्न करून पिल्लाला पकडले आणि ते पिल्लू वनविभागाकडे सोपविले. दरम्यान, या घटनेनंतर संदीप देशपांडे याठिकाणी भेट देत संताप व्यक्त केला होता. तसेच हे संग्रहालय बेकायदा असून खासगी व्यक्ती संग्रहालय सुरू केल्याने त्यांनी या संपूर्ण घटनेची पालिका आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे.