मुंबई – शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना आता शिंदे गटाने दादारमध्ये वेगळं कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेलं शिवसेना भवन देखील दादरमध्येच असून आता शिंदे गटने देखील त्यांचे मुख्य कार्यालय दादरमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
सरवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच मुंबईतील प्रत्येक प्रभागात देखील असेच एक कार्यालय उभारण्यात येणार आहे. तेथिल शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यासोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, या कार्यालयांसाठी जागादेखील निश्चीत झाल्या आहेत. येत्या पंधरा दिसांमध्ये या कार्यालयांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.