दोन टप्प्यांत काम : निवडणुकीच्या तोंडावर निविदा मंजुरीची घाई
पिंपरी – औंध -रावेत बीआरटीएस रस्त्यावरील राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या आणि डांगे चौक ते मुकाई चौक पर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी राबविलेल्या स्वतंत्र निविदा प्रक्रियेत 12 ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये इतर ठेकेदारांपेक्षा 25.50 टक्के कमी दर सादर करणाऱ्या ठेकेदाराला दोन्ही रस्त्यांचे मिळून साडेपाच कोटी रूपयांचे काम बहाल करण्यात येणार आहे.
औंध – रावेत रस्त्यावरील राजीव गांधी पुल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या आणि डांगे चौक ते मुकाई चौक पर्यंतच्या रस्त्यांचे पंचवर्क पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच स्थापत्यविषयक कामे करण्यात
येणार आहेत. राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 3 कोटी 73 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. तर, डांगे चौक ते मुकाई चौक पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 61 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. दोन्ही कामांसाठी रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग शुल्क वगळून प्रशासनाने निविदा मागविण्यात आल्या होत्या.
या दोन्ही कामांकरिता 12 ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी श्रीगणेश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने दोन्ही कामांसाठी निविदा दरापेक्षा 25.50 टक्के कमी दराने निविदा सादर केली. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा कमी येत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या कामांची निविदा स्विकारण्यास मान्यता दिली आहे. राजीव गांधी पुल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या कामासाठी 2 कोटी 78 लाख रूपये आणि डांगे चौक ते मुकाई चौक पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 69 लाख रूपये खर्च होणार आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे करण्यासाठी एकूण 5 कोटी 48 लाख 51 हजार रूपये खर्च होणार आहे. या रस्त्यांचे काम एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने मंजुरी देण्यात आली.