योगेश गांगर्डे
कर्जत – येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी पैसे भरले आहेत, तरी शेतजमिनींची मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांची प्रकरणे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. दरम्यान, वेळेवर मोजणी होत नसल्याने “साहेब आमच्या जमिनीची मोजणी कधी होणार, आमचा नंबर कधी लागणार’? असा सवाल कर्जत तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. कोंभळी येथील एका शेतकऱ्याची मोजणी पूर्ण न करताच ते प्रकरण निकाली काढण्याचा अजब प्रकार भूमिअभिलेख कार्यालयाने केला आहे.
तालुक्यातील तब्बल 617 शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत. त्यामध्ये 533 शेतकऱ्यांनी फी भरलेली असून या शेतकऱ्यांची मोजणी बाकी आहे. तसेच फी न भरलेले 84 अर्ज आहेत.
कर्जत तालुक्यात जमिनीचे बांध आणि रस्ते यासाठी ठिकठिकाणी दररोज वाद होत असतात. त्यामुळे अनेक शेतकरी जमिनीची मोजणी करून हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी शेतकरी कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज करून फी भरतात, मात्र फी भरल्यानंतर शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत जाते.
कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्यांबरोबर उद्धटपणे बोलतात, त्यांना व्यवस्थित माहिती न देता मोजणीसाठी तारीख पे तारीख देतात. अनेक शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीचे, रस्त्याचे प्रकरणे इथे प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी पूर्ण न करताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ती प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामुळे शेतकरी भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
– एकूण विविध 9 पदे रिक्त
शिरस्तेदर 1, छाननी लिपिक 1, प्रति लिपिक 1,आवकजावक लिपिक 1, दुरुस्ती लिपिक 1, कनिष्ठ लिपिक 1, शिपाई 3 अशी एकूण 9 पदे रिक्त आहेत.
-जागा रिक्त असल्याने मोजणीची कामे रखडली
कर्जत येथील भूमि अभिलेख कार्यालयात एकूण 20 पदे आहेत. सध्या 11 कार्यरत आहेत, तर 9 पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचारी बळामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.
-प्रकरणे रखडल्याने नाराजी
कर्जत तालुक्यात जमीन मोजणीचे जवळपास 533 अर्ज प्रलंबित आहेत. 617 अर्ज कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यातील 533 जणांनी फी भरलेली आहे. 84 अर्जदारांनी फी भरलेली नाही. त्यातील 533 प्रकरणे रखडली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
21 फेब्रुवारी 2019 ला भूमिअभिलेख कार्यालयात अतितातडीच्या मोजणीसाठी अर्ज करून फी भरली. 4 एप्रिलला कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केली, मात्र हद्दी न दाखवताच त्यांनी खोट्या सह्या करून माझे प्रकरण निकाली काढले आहे. मागितलेल्या माहितीत मोजणीच्या क प्रतिमध्ये 30 एप्रिल 2019 ही हद्दी दाखवल्याची तारीख टाकून फाईल बंद केली आहे.
संतराम गांगर्डे, शेतकरी, कोंभळी.
कामे अधिक असल्याने आणि अपुरे कर्मचारी असल्यामुळे कामे रखडलेली आहेत. कर्मचारी संख्या वाढ झाल्यास कामांचा लवकर निपटारा होईल. सर्व कामे लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
अनंत पाटील, उपअधीक्षक, भूमीअभिलेख, कर्जत