घरगुती हिंसाचारापासून सुटका कधी?

समाज आणि कुटुंबाची धुरा स्त्री समर्थपणे पेलते, पण तरीही आजही महिलांबरोबर दुय्यम दर्जाचा व्यवहार केला जातो. याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले ते हरियाणाच्या महिला न्यायाधीशांच्या स्वरूपात. उच्च शिक्षित आणि पेशाने वकील असलेल्या आपल्या नवऱ्याच्या विरोधातच त्यांना घरगुती हिंसाचाराची केस दाखल करावी लागली आहे.

लैंगिक हिंसाचार देशासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब असल्याचे काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालात म्हटले आहेच. भारतातील तब्बल एक तृतियांश विवाहित महिला या नवऱ्याकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरतात, असे हा अहवाल सांगतो. हा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा समाजातील अनेक वर्गांतून याला विरोध झाला आणि ही सत्यपरिस्थिती नाकारून बदलत्या समाजात स्वतःची प्रतिमा पहिल्यापेक्षा अधिक उजळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात कोंबडे झाकले तरी सूर्य उगवायचा राहात नाही त्याप्रमाणेच सत्य कितीही काळ झाकून ठेवले तरी ते लपून राहू शकत नाही.

हरियाणातील एका दिवाणी न्यायाधीश महिलेला आपल्याच उच्च शिक्षित वकील नवऱ्यावर घरगुती लैंगिक हिंसाचाराचा खटला दाखल करावा लागला आहे. नवऱ्याने आपला गळा दाबून आणि तोंडावर उशी दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय नवरा शिवीगाळ करतो आणि पगाराचा हिशेबही मागतो असाही आरोप त्यांनी लावला आहे. त्यांनी पोलिसांकडे ही तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपीवर फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि मारहाण करणे यासह अनेक कलमांखाली खटला दाखल केला आहे. हे प्रकरण म्हणजे घरगुती हिंसाचाराचे टोक आहे. समाजातील अन्यायग्रस्तांना कायदेशीर तरतुदींचा अन्वयार्थ लावून न्याय देणाऱ्या व्यक्तीलाच जर हिंसेला सामोरे जावे लागत असेल तर सर्वसाधारण भारतीय महिला कौटुंबिक परिस्थितीत काय पातळीपर्यंतचे शोषण सहन करत असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

महिला ह्या समाजाच्या, कुटुंबाच्या पाया असतात. पण तरीही त्यांच्यासमवेत दुय्यम दर्जाची वर्तणूक केली जात असल्याचे दिसते. समानतेचा मानवी हक्क आजही या अर्ध्या लोकसंख्येच्या वाट्याला येत नाही असेच चित्र आहे. भारतातच नव्हे तर जगभरात स्त्रिया आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करताहेत. त्यांच्या या संघर्षात मोठा अडथळा आहे तो लैंगिक असमानतेचा. पुरुष आणि महिला यांच्यामध्ये असणारी असमानतेची दरी अर्ध्या लोकसंख्येसाठी शाप ठऱते आहे. महिलांना घर असो किंवा ऑफिस असमानतेचे विचार आणि असमान वर्तणूक याच्याशी आजही सामना करावा लागतो. एका अभ्यासानुसार भारतातच नव्हे तर जगभरातच वाढत्या आर्थिक असमानतेचा प्रभाव मुली आणि महिलांवरच होतो आहे. आजही स्त्रीने कितीही प्रगती केली तरीही पारंपरिक दृष्टीने समाज महिलांकडे कमजोर वर्ग म्हणूनच पाहातो त्यामुळे महिलांची भागीदारी कमी महत्त्वाची मानली जाते. परिणामी घर आणि ऑफिस दोन्हीकडे महिलांची उपेक्षा, शोषण, अपमान होतो आणि भेदभाव होतो हे चित्र आजही कायम आहेच. महिलांप्रती भेदभावाची वर्तणूक जगातील प्रत्येक भागात थोड्याफार फरकाने पाहायला मिळतेच.

कोणताही समाज सभ्य आणि संवेदनशील आहे हे ठरवण्यासाठी हा समाज स्त्रिया आणि कमजोर वर्ग यांच्याशी कशी वर्तणूक करतो, हा निकषही लावला पाहिजे. बहुतांश समाजात विकासाच्या दिखाऊपणावर लक्ष दिले जाते. सामाजिक विकासात महत्त्वाचे असलेले महिलांचे अधिकार आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता याकडे साफ दुर्लक्षच केले जाते. घराबाहेर महिलांविरोधी गुन्हेगारी घटना घडणे ही एक मोठी समस्या आहेच, पण आपल्याच कुटुंबात कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागणाऱ्या स्त्रियांची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here