सुशांतसिंह राजपूत : हत्या की आत्महत्या? अंतिम निष्कर्ष केव्हा? – सचिन सावंत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने हत्या की आत्महत्या अशा चर्चा सुरु झाल्या. राज्यासह देशातील राजकारण तापलं. सीबीआयसह सर्व केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात तपासासाठी आल्या.

यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांतच्या मृत्यूबाबत CBI अंतिम निष्कर्ष केव्हा सांगणार? असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

सचिन सावंत यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष, सीबीआय चौकशीला ३१० दिवस व एम्स पॅनेलने हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले.

सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे? सीबीआयवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी सवाल उपस्थि केले आहेत.

याशिवाय, त्यांनी अँटिलिया प्रकरणावरुन देखील प्रश्न उपस्थि केले आहेत. “जर अँटेलीया कट रचणारे वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते तर एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? काही गुप्त करार झाला आहे का? परमबीर सिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही?” अशी प्रश्नांची सरबत्तीच सचिन सावंत यांनी केली आहे.

जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु अखेर सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.