सणासुदीला चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याप्रमाणेच चांदीदेखील वेगवेगळ्या प्रकारात मिळते. चांदीची भांडी, दागिने, विटा, नाणी स्वरुपात चांदी बाजारात उपलब्ध असते. सध्या सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर असल्याने पर्याय म्हणून चांदीचा विचार करायला हरकत नाही. चांदी खरेदी करण्यापूर्वी पुढील गोष्टींचा विचार करा.
चांदीची शुद्धता : सोन्याप्रमाणेच हॉलमार्क प्रमाणित चांदी घ्या. द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंड़र्डस् (बीआयएस) हॉलमार्कच्या चांदीच्या वस्तू खरेदी करा. बीआयएसच्या नियमानुसार हॉलमार्क असलेल्या चांदीच्या वस्तू खरेदी करताना चार गोष्टी पहा. सोने आणि चांदीच्या दागिन्यांवरली हॉलमार्किंग ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया असते. जर सराफ तुम्हांला विना हॉलमार्क दागिने देऊ केले तर तुम्ही त्याच्याकडे हॉलमार्क प्रमाणित मागणी करू शकता. चांदीच्या हॉलमार्क असलेल्या वस्तू म्हणजे शुद्ध चांदीचा कायदेशीर पुरावा
- पबीआयएस लोगो
- पशुद्धतेची मात्रा/शुद्धता
- पहॉलमार्किंग केंद्राची ओळख सांगणारी खूण/क्रमांक
- पसराफाची ओळख सांगणारी खूण/क्रमांक
1 जानेवारी 2017 पूर्वी हॉलमार्किंगचे वर्ष ही देखील अतिरिक्त खूण होती. मात्र त्यानंतर लागू झालेल्या नव्या नियमात ही खूण वगळण्यात आली आहे. चांदीच्या भांड्यात किंवा वस्तूंमध्ये कठीणपणा येण्यासाठी त्यामध्ये काहीप्रमाणात अन्य धातूचा समावेश केला जातो. त्यामुळे खरेदी करताना चांदीमध्ये कुठल्या प्रकारचा धातू मिसळण्यात आला आहे हे सराफाला विचारू शकता. साधारणपणे चांदीच्या वस्तू बनवताना टिकाऊपणासाठी त्यामध्ये तांबे किंवा जस्त मिसळण्यात येते.
घडणावळ : चांदीचे दागिने खरेदी करताना बहुतेकवेळा त्यावर लिहिलेल्या किंमतीला खरेदी केली जाते. परंतु चांदीची शुद्धता, खरेदीच्या वेळचा भाव आणि घडणावळ याबाबत तुम्ही दुकानदाराला विचारले पाहिजे. साधारणपणे चांदीच्या वस्तुंसाठी प्रतिग्रॅम 3 रुपये घडणावळ आकारली जाते.
सोन्याच्या तुलनेत चांदीचे दागिने/वस्तुंवरील घडणावळ कमी असते. बीआयएस संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रत्येक वस्तुमागे हॉलमार्किंगचा खर्च 25 रुपये धरला जातो. त्याखेरीज सेवाकर आणि अन्य कर आकारण्यात आलेले असतात.
परत खरेदीचे (बाय बॅक) धोरण : अनेकजण सोन्या-चांदीचे नवे दागिने खरेदी करण्यासाठी जुने दागिने मोडतात. त्यामुळे चांदीचे दागिने किंवा भांडी खरेदी करताना सराफाकडे परत खरेदीचे नियम विचारून घ्या. खरेदी केलेली वस्तू तुम्ही परत त्याच सराफाकडे विकण्यासाठी/मोडण्यासाठी आलात तर किती पैसे मिळू शकतात हे विचारून घ्या. काहीवेळा चांदीच्या दागिन्यांमध्ये खडे मढवलेले असतात. त्याचे वजन दागिन्याच्या एकूण वजनात समाविष्ट केले आहे किंवा कसे याची विचारणा करा.
तसेच त्या खड्यांची किंमत काय लावलेली आहे याचीही माहिती घ्या. जर्मन सिल्वहर म्हणजे तांबे किंवा अन्य धातूवर चांदीचा लेप देऊन बनवण्यात आलेल्या वस्तू किंवा दागिने. त्यावर बीआयएस हॉलमार्क नसतो. त्याउलट स्टर्लिंग सिल्व्हर ही शुद्ध चांदी असते आणि त्यामध्ये कठीणपणा येण्यासाठी इतर धातू मिसळून वस्तू बनवल्या जातात. त्यावर बीआयएस हॉलमार्क असतो.