सोने महागताय; आगामी काळात किती वाढणार दर?

अनेक परिस्थितीजन्य कारणामुळे वाढलेले सोन्याचे दर गेल्या महिन्यात बऱ्याच खालच्या पातळीवर आले आहेत. त्यामुळे सोन्याची वाटचाल कशी राहील याबाबत अनेक गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता आहे. बरेच विश्‍लेषक सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्यात अशी गुंतवणूक फायदेशीर राहू शकते असे सुचवीत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी असेल याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण होणे सहाजिक आहे.

गेल्या वर्षी अनेक देशात प्रदीर्घ लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात मंदी आली होती. म्यन्युफॅक्‍चरींग व सेवा क्षेत्र ठप्प झाले होते. शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. त्यामुळे गेल्या वर्षी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी सोन्याकडे धाव घेतली होती. परिणामी गेल्या वर्षी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले होते.

डिसेंबरनंतर करोनावरील लसी उपलब्ध झाल्या आहेत. विकसित देशाकडे ही लस खरेदी करून नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी बऱ्याच पायाभूत सुविधा आहेत. या देशांनी वेगात लसीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्‍चरिंग आणि सेवा क्षेत्रातील काम वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी कोसळलेले शेअर निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले आहेत.

शेअर बाजारातून अधिक परतावा मिळण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळली आहे. या कारणामुळे गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. भारतात सध्या सोन्याचे दर 45 हजार रुपयांवर आले आहेत.

त्यामुळे सध्या कमी पातळीवर असलेल्या सोन्याची काही गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. तर काही गुंतवणूकदार सोन्याचे दर आणखी कमी होतील का, त्याचबरोबर आगामी काळात सोन्याचे दर वाढतील का, वाढले तर कोणत्या पातळीपर्यंत वाढतील याबाबत विचार करीत आहेत.

याबाबत बऱ्याच ब्रोकरेज आणि विश्‍लेषकांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर सोने खरेदी फायदेशीर होण्याची जास्त शक्‍यता आहे. या आठवड्यात अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर झाले आहे. महागाई वाढण्याच्या शक्‍यतेमुळे सरकारी रोख्यांवरील परतावा वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉलर बळकट होऊन सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र फेडरल रिझर्व्हने जाहीर केलेल्या पत धोरणांमध्ये महागाई वाढण्याची शक्‍यता असली तरी किमान एक वर्ष व्याजदरात वाढ करणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पत धोरणानंतर लगेच जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात भारतीय सराफात सोन्याच्या दरात प्रत्येक दिवशी माफक वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

या परिस्थितीबाबत आयआयएफएल सिक्‍युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले की, ही घडामोड सोन्याच्या दरात वाढ होण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात सोन्याचे दर दोन महिन्यात 1,780 ते 1,800 डॉलर प्रति औंस या पातळीवर जाऊ शकतात.

तर भारतीय बाजारांमध्ये दोन महिन्यात सोन्याचे दर 48 हजारावर जाण्याची शक्‍यता त्यांना वाटते. कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती चांदीच्या दराबाबत राहणार आहे. चांदीला गुंतवणुकीबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील मागणीचा आधार असतो.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांनी सांगितले की सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,650 ते 1,730 डॉलर प्रति औंस या टप्प्यात आहेत. सोन्याच्या दराने 1,730 डॉलरचा टप्पा ओलांडल्यानंतर सोन्याचे दर वेगाने वाढून 1,760 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत जाऊ शकतात.

भारतात वायदे बाजारात सोन्याने 45,600 ही पातळी ओलांडल्यानंतर सोन्याचे दर वेगाने वाढण्याची शक्‍यता त्यांना वाटते. त्यामुळे सोन्याचे दर 45,600 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीच्या खाली असल्यानंतर खरेदी करणाऱ्यासाठी ही चांगली संधी आहे, असे बरेच विश्‍लेषक सुचवितात. भारतात सध्या सोन्याचे दर 45 हजार रुपयांच्या खाली आहेत. त्यामुळे सध्या सोन्याची खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.