-->

नाती, पैसा आणि भावनांचा ताळमेळ कसा घालावा?

सध्या जग वेगाने बदलते आहे. नाती, कुटुंब, मूल्ये याबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलल्या आहेत. सगळे काही व्यक्ती केंद्रीत झाले आहे. अशा स्थितीत फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या हिताच्या स्वार्थी विचारांना प्रत्येकाकडून नकळत प्राधान्य दिले जाते. काहीवेळा भावनिक गुंतागुंत तयार करून त्यातून आर्थिक स्वार्थ साधला जातो. केवळ ओळखीचे, मित्र, नातेवाईक यांच्याकडूनच नव्हे तर अगदी पोटच्या मुलाकडून, सूनेकडून, नातवंडांकडूनही ज्येष्ठ व्यक्तीच्या भावनिक ओलाव्याचा आर्थिक पातळीवर गैरफायदा घेतला जाण्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.

या सगळ्यांना शांतपणे तोंड द्यायचे असेल आणि स्वतःचे भविष्य संकटात येऊ नये असे वाटत असेल तर भावना बाजूला ठेवून पक्के व्यवहारी बनणे आवश्‍यक असते. होते काय की, तुमच्या सहकाऱ्याने तुमच्याकडून पैसे उसने घेतलेले असतात. ते पैसे परत करावेत म्हणून तुम्ही त्याला आठवण करून देता आणि तो विसरून जातो. तुमची कमावती आणि लग्न झालेली मुलगी किंवा मुलगा त्याच्या व्यवसायाला मदत म्हणून किंवा त्याला घर घेण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम मागतो किंवा तुमच्या भावंडाला तुमच्यासोबत स्टार्टअपमध्ये भागीदार म्हणून यायचे आहे. अशा प्रसंगात काय करावे असा प्रश्न पडतो.

नाती, पैसा आणि भावना एकत्र आल्या की अनेक गुंतागुंतीची आणि न उलगडणारी कोडी तयार होत जातात आणि मग यातून तयार झालेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अशक्‍य होऊन बसते. अगदी घट्ट आणि मायेच्या नात्यालाही अनेकदा पैशाची दृष्ट लागते. पैशाच्या वादातून पती- पत्नीच्या खासगी बाबींवर अतिक्रमण होते. उदाहरणार्थ – पत्नीच्या शॉपिंगच्या सवयी, भावंडांमधील वाटण्यांवरून निर्माण होणारा दुरावा. उसन्या घेतलेल्या पैशावरून मैत्रीत दुरावा निर्माण होणे अशा घटनांमधून नाती दुरावतात किंवा कायमची तुटतात. त्यामुळेच नात्यात पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागते.

कारण पैसा आला की, नात्यामध्ये कुरबुरी सुरु होतात. मग ते नाते मैत्रीचे असो की, कुटुंबातील. नात्यातील कुणाकडून पैशाचा विषय निघाला की, आपली परिस्थिती अवघडल्यासारखी होते. आता हे झाले बाहेरच्या व्यक्तींबाबत. पण सध्याची बदललेली कुटुंब व्यवस्था आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकी हट्टाग्रह याचा विचार करता स्वतःच्या मुलानेच आर्थिक मदत मागितली तर कोणत्या मुद्यांचा शांतपणे विचार केला पाहिजे याविषयी…

आर्थिक मदतीच्या मागणीचे स्वरुप काय आहे?
हा महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे बाजूला ठेवलेली रोकड नसेल आणि निवृत्तीनंतर लागणार म्हणून बाजूला ठेवलेल्या बचतीतूनच तुम्हांला पैसे द्यावे लागणार असतील तर तुम्ही मुलाला नम्रपणे नकार कळवा. तुम्ही निवृत्तीसाठी पैसा राखून ठेवला असेलतर तो पैसा धोक्‍यात घालून मुलाने नवा व्यवसाय किंवा स्टार्टअप करण्याची काहीही गरज नाही. निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी काढून ठेवलेला पैसा त्याच कारणासाठी वापरला गेला पाहिजे. अन्य कुठल्याही कारणासाठी तो पैसा वापरला जाणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे असते.

त्याउलट तो पहिल्यांदाच पैसे मागत असेल आणि तुम्हांला निश्चितपणे माहित असेल की, तो खरोखच आर्थिक पेचप्रसंगात सापडला आहे तर तुम्ही त्याला पैशाची मदत करण्यास हरकत नाही. पण त्यासाठी अतिशय व्यावसायिक पद्धतीने वागण्याची गरज असते. पैसे धनादेशाद्वारे देणे आणि ते पैसे ठरलेल्या कामासाठीच वापरले जात आहेत यावर लक्ष ठेवणे. त्याचबरोबर ठराविक कालावधीत ते पैसे परत मिळण्याची अट घालणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतात. अन्यथा पैशाची सतत मागणी होऊ शकते. आता तुमचा मुलगा प्रौढ झाला आहे ह लक्षात घेऊन त्याच्याशी पैशाचे व्यवहार करावेत.

आर्थिक मदतीची कुटुंबियांना माहिती असणे/नसणे: अनेकदा मुलाला अशा प्रकारे आर्थिक मदत करण्याचा विषय तुमच्या कुटुंबातील वातावरण कसे आहे यावरून किती गुप्त ठेवायचा हे ठरत असते. एका मुलाला आर्थिक मदत केल्यावर अनेकदा गरज नसताना विविध कारणे सांगून दुसऱ्या मुलाकडूनही आर्थिक मागण्या केल्या जातात.

त्यामुळे असे व्यवहार नोंदणीकृत व धनादेशानेच करावेत, त्यामध्ये पत्नीलाही सहभागी करून घ्यावे. मात्र याची माहिती दुसऱ्या मुलापर्यंत शक्‍यतो पोचणार नाही याची काळजी घ्यावी. तुमच्या कुटुंबात तेवढे ऐक्‍य असेल तर त्याबाबत दुसऱ्या मुलाला सांगण्यास हरकत नाही. निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद महत्त्वाची जर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मुलाला पैसे हवे असतील तर त्याला पर्यायी उपाय सुचवा.

मुलगा कर्ज घेऊन गरज भागवू शकतो. विमा पॉलिसी किंवा सोन्यावर कर्ज घेऊ शकतो किंवा त्याची काही वैयक्तिक संपत्ती असेल तर त्यावर कर्ज घेऊ शकतो. त्याच्याकडील पर्याय वापरण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असू शकतो. हे सगळे टाळून तुमच्या निवृत्तीनंतर लागणाऱ्या पैशाची कुणीही मागणी केली तरी त्या पैशाला हात लावू नका. नात्यातील आणि विशेषतः मुलाला दिलेले पैसे परत येण्याची शक्‍यता शून्य असते.

पैशाचा विनियोग कशासाठी होणार आहे? फ्लॅट घेण्यासाठी किंवा फार्म हाऊस, जमिन घेण्यासाठी तुमच्याकडून पैसे हवे असतील तर तुम्ही थेट नकार देऊ शकता. समजा रुग्णालयाचा किंवा अचानक उद्भवलेला वैद्यकीय खर्च असेल तर अर्थातच जवळ असणारे पैसे मुलासाठी खर्च करावेत. कारण पैशापेक्षा जीव महत्त्वाचा नसतो. खरे तर प्रत्येकाने वैद्यकीय संकटाची तयारी म्हणून आरोग्य विमा व इतर तरतुदी करून ठेवणे गरजेचे असते. समजा अशी व्यवस्था करण्यात आली नसेल तर निवृत्तीनंतरच्या निधीला हात लावण्याआधी तुमच्याकडील संपत्ती विकून पैसा उभा करा.

दुसरीक़डे फ्लॅट किंवा जमिन घेण्यासाठी पैसे हवे असतील तर कर्जाऊ पैसे देऊन तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये निम्म्या हिश्‍शासाठी तुमचे नाव लावून घेऊ शकता. मुख्य म्हणजे स्वतःच्या आर्थिक अडचणी मुलाने स्वतः सोडवल्या पाहिजेत या भूमिकेवर ठाम रहा.

पैसे दिल्याबाबत नोंदणी केलेला करार हवा?
तुम्ही जर का मुलाला कर्ज म्हणून मोठी रक्कम देत असाल त्यासंदर्भातील सर्व अटी व परत करण्याची तारखेनुसार माहिती लिहून तो करार नोंदणी करून घ्यावा. मूळ मुद्दल, त्यावरील व्याज असा सगळा तपशील त्यामध्ये असावा. त्यासाठी तज्ञ वकिलाची मदत घ्यावी. केवळ भावनिक होऊन मदत करू नका. हा पूर्णपणे व्यावसायिक व्यवहार आहे या भूमिकेतून त्याकडे पहा. जेणेकरून नंतर तुम्हांला पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.