नव्या युगासाठी सज्ज टाटा केमिकल्स

टाटा केमिकल्सचा इतिहास 1927 मध्ये सुरु झालेल्या ओखामंडल सॉल्ट वर्क्‍सपासून सुरु होतो. 1939 मध्ये जेआरडी टाटा यांनी ही कंपनी विकत घेतली आणि मीठापासून सुरू झालेली ही कंपनी रसायनांच्या विविध क्षेत्रात विज्ञानाधारीत कार्य करत लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत राहिली आणि आता बदलत्या युगात देशात इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या लिथियम आयन बॅटऱ्यांच्या क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त करण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू झालेली आहे.

गुजरातमधील मिठापूर येथे सुरु झालेली ही छोटी कंपनी आज लाखो लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी आणि चार महाद्वीपात पोचलेली जगातील एक अग्रगण्य कंपनी बनलेली आहे. पण तिचे कार्य फक्त मिठापुरते मर्यादित नाही. तरीही मीठ म्हटले की, साहजिकच समोर नाव येते टाटा मीठ, टाटा शुद्ध मीठ. हे मीठ बनवणारी कंपनी आहे टाटा केमिकल्स लिमिटेड.

आज इंडस्ट्रियल केमिकलमध्ये सोडा ऍश बनवणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. आशिया, युरोप, अफ्रिका आणि उत्तर अमेरिकेत या कंपनीचे कारखाने आहेत. सोडियम बायकार्बोनेट बनवणारी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

काच व डिटर्जंट व इतर औद्योगिक गरजा पूर्ण करण्यात कंपनीचे मोठे योगदान आहे. टाटा सॉल्ट म्हणजे टाटा मीठ हे आज भारतातील सर्वांना माहीत आहेच पण याबरोबरच नैसर्गिकरित्या प्रक्रिया केलेले व सर्व प्रोटीनमूल्य अबाधित ठेवून पॅक केलेल्या डाळी, कडधान्ये व मसाले हे टाटा संपन्न नावाने लोकप्रिय आहेत.

अन्नपदार्थ, सौंदर्यसाधने, सिमेंट, शेती, रसायने ह्या व इतर अनेक क्षेत्रात कंपनीचे नाव आहेच पण त्याचबरोबर व्यवसायाच्या पुढे जाऊन विज्ञानाची फळे लोकांपर्यंत पोचवण्याच्या ध्यासाने कार्यरत असलेल्या या कंपनीने आता वाहनउद्योग क्षेत्रातील बदलती पावले ओळखून त्या दिशेने केव्हाच प्रवास सुरू केलेला आहे. आगामी काळ हा विजेवर चालणाऱ्या मोटारींचा (इलेक्‍ट्रिक व्हेईकल्स-ईव्ही) असणार आहे हे सुनिश्चित झाले आहे.

त्यादृष्टीने वाहन उद्योगात आमूलाग्र बदल होत आहेत. या वाहनांसाठी लिथियम-आयन सेल लागतात आणि टाटा केमिकल्सच्या विस्तारीत योजनांमध्ये लिथियम आयन सेलच्या उत्पादनाबरोबरच रसायन, कृषी रसायन आणि पोषक घटकांच्या क्षेत्रात काम करण्याचा आराखडा आहे. मुख्य म्हणजे गेल्या पंधरा महिन्यांच्या काळात टाटा समूहाने या कंपनीतील स्वतःचा हिस्सा वाढवत नेला आहे. सप्टेंबर 2019 मध्ये टाटा समूहचा कंपनीतील हिस्सा 30.63 टक्के होता. गेल्या पंधरा महिन्यात तो 37.08 टक्‍क्‍यांयांवर पोचला आहे.

आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये बॅटरी हा महत्त्वाचा घटक असणार आहे आणि यासाठीची आवश्‍यक ती संपूर्ण यंत्रणा उभारण्यासाठीची गुंतवणूक कंपनीतर्फे करण्यात येत आहे. लिथियम बॅटरीसाठी लागणारे घटक, त्याचा पुनर्वापर, विक्रीपश्चात सेवा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ही सगळी यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने टाटा समूहातील टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी एकत्रितपणे काम सुरु केले आहे. टाटा समूहातील जग्वार लॅंड रोव्हरच्या सर्व मोटारी 2025 पर्यंत विजेवर चालणाऱ्या असतील, असे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या सगळ्या विस्तारासाठी 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे टाटा केमिकल्सचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 800 कोटी आतापर्यंत वापरण्यात आले आहेत.

कंपनी मूलभूत रसायन आणि विशेष रसायन अशा दोन भागात काम करते. मूलभूत रसायनांच्या क्षेत्रात काम करताना कंपनी जगातील काचेच्या क्षेत्रात काम करणारे नामवंत ब्रॅंड, औषध, बिस्कीटे आणि बेकरी उद्योग तसेच इतर उद्योगक्षेत्रांना विविध रसायन उत्पादने पुरवते. कंपनीकडे व्यावसायिक मीठ उत्पादनासाठीची आशियातील सर्वात मोठी मीठागरांची व्यवस्था आहे.

टाटा केमिकल्स ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सोडा ऍश उत्पादन करणारी कंपनी आहे. त्याखेरीज सोडियम बायकार्बोनेट बनवणारी ही जगातील सहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. विशेष रसायन विभागाचा (स्पेशालिटी केमिस्ट्री) विचार केला तर कंपनी टाटा एनक्‍यू द्वारे विज्ञानाधारीत पोषणमूल्य पर्यायांच्या क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. अगदी प्राण्यांचे अन्न आणि आरोग्यक्षेत्रातही कंपनी कार्यरत आहे. शेतीसंबंधी सर्व समस्यांबरोबरच पिकांसाठी पोषक द्रव्ये आणि गरजा लक्षात घेऊन त्यानुसार खते, युरिया, फॉस्फेट खते ही कंपनी पुरवते. या कंपनीची उपकंपनी रॅलीज इंडिया पिक संरक्षणासाठी लागणारी सर्व साधनसामग्री तयार करते.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत असताना त्या बदलांचा आधीच वेध घेऊन त्या दिशेने आत्मविश्वासाने पावले टाकणाऱ्या या कंपनीतील गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.