सव्वाशे वर्षांचा अनुभव असलेली ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड’

शंभर वर्षांचा इतिहास असलेली ब्रिटानिया इंडस्ट्रीज ही बिस्कीटे व अन्य खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. वार्षिक 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या या कंपनीची बिस्कीटांच्या बाजारपेठेवर पकड आहे. गुड डे, टायगर, न्यूट्री चॉईस, मिल्की बिकिस आणि मारी गोल्ड यासारख्या ब्रॅंडनी बाजारपेठेत स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. अनेकांची रोजची सकाळ चहाबरोबर ब्रिटानियांच्या उत्पादनांनी होत असल्याने ब्रिटानिया बिस्किटांबरोबर गेल्या शंभर वर्षात अनेक पिढ्यांचे नाते तयार झाले आहे.

आज देशभरातील 50 लाख किरकोळ विक्रीच्या दुकानांमधून ब्रिटानियाची उत्पादने किमान 50 टक्के घरांमध्ये पोचतात. कंपनीच्या एकूण उलाढालीत पाच टक्के वाटा दूध व्यवसायाचा आहे. ब्रिटानियाची दुग्ध उत्पादने देशातील एका लाख दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. संघटित बाजारपेठेतील ब्रिटानिया ब्रेड हा सर्वात मोठा ब्रॅंड आहे. कंपनी वर्षाला 450 कोटी रुपयांच्या सुमारे 1 लाख टन ब्रेडची विक्री करते. त्यासाठी कंपनीचे तेरा कारखाने आणि चार फ्रॅंचायसी आहेत. त्याद्वारे देशातील शंभराहून अधिक शहरांमध्ये रोज ब्रेडच्या दहा लाख लाद्या विकल्या जातात.

अनेकांची सकाळ सुरु होते ती वाफाळत्या चहाबरोबर ब्रिटानियाची बिस्किटे, टोस्ट किंवा ब्रेडबरोबर. मोबाईल बघत, वर्तमानपत्र वाचत सकाळच्या चहाबरोबर बिस्किटांचा आनंद आपण घेतो. सकाळच्या गडबडीच्या वेळेतही चहाची पाच-दहा मिनिटे आपल्याला निवांतपणा देणारी ठरतात. अशावेळी आपल्या हातातील बिस्किटे कुठल्या ब्रॅंडची/कंपनीची आहेत आणि त्या कंपनीचा विस्तार केवढा आहे ह्याचा विचार आपण क्वचितच करतो. मोठा विस्तार आणि सततची विक्री अशा ब्रिटानिया कंपनीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य जाणून घेणेगुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. 1892 साली म्हणजेच तब्बल 126 वर्षांपूर्वी कोलकत्यामध्ये त्यावेळच्या 295 रुपयांची गुंतवणूक करून या कंपनीची सुरवात झाली.

सुरवातीला काजू आणि सागरी उत्पादने परदेशी पाठवणे असे या कंपनीच्या कामाचे स्वरुप होते. ही कंपनी कागदोपत्री अस्तित्वात आली 1918 साली. पण त्याआधी 1910 मध्ये कंपनीने निरनिराळी बेकरी उत्पादने आणि सोयाबिनचे पदार्थांचे उत्पादन सुरु केले होते. त्यासाठी या कंपनीने 1910 मध्ये पहिल्यांदा विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर सुरु केला.

1921 मध्ये कंपनीने नवीन यंत्रसामग्री आणली आणि गॅस ओव्हनचा वापर करुन बिस्किटे बनवणारी भारतातील पहिली कंपनी म्हणून मान मिळवला. 1924 मध्ये कंपनीने मुंबईत उत्पादने बनविण्यास सुरवात केली. 1939 ते 45 या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात कंपनीने फक्त बिस्किटे पुरवण्याचे मोठे काम केले. या काळात कंपनीच्या प्रकल्पांमध्ये जवळपास 90 टक्के उत्पादन बिस्किटांचेच होत होते.

1951 मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रिजने दिल्ली बिस्किट कंपनी ताब्यात घेतली आणि नंतरच्या तीन वर्षात उत्तम दर्जाच्या ब्रेडचे उत्पादन सुरु केले. 1986 मध्ये सुरु केलेला गुड डे हा बिस्किटाचा ब्रॅंड, त्याच साली बाजारात आणलेले व्हायटल हे स्वयंपाकाचे तेल, 1990 मध्ये आलेले मिल्क बिकिज्‌ , फ्रूट ब्रेड, 1992 साली लिटिल हार्ट आणि त्यानंतर आलेल्या फिफ्टी-फिफ्टी बिस्किटांची चव कायम लोकांच्या जिभेवर रेंगाळत राहिली.

1995 मध्ये आणलेली सॅंडविच बिस्किटे, केकरोल आणि 1996 मध्ये आलेल्या मारीगोल्ड बिस्किटांनी तर बाजारात एकच धूम निर्माण केली ती आजतागायत कायम आहे. 1997 मध्ये त्यांनी टायगर ब्रॅंडची बिस्किटे, चेकर्स, जीमजॅम आणि त्याचबरोबर प्रसिद्ध ब्रिटानिया चीज आणले. आजही निरनिराळ्या प्रकारच्या ब्रिटानिया चीजला कायम मागणी असते. लोकांना जणू या सगळ्या उत्पादनांची सवयच लागलेली आहे. वाढती मागणी आणि विक्री पाहून ब्रिटानियाने कोची, हैदराबाद आणि चेन्नई येथे उत्पादन प्रकल्प सुरु केले. पाठोपाठ उत्तरांचलमध्येही मोठे युनिट कार्यरत झाले. या बरोबरीने त्यांच्या मिल्कमन ब्रॅंड प्रसिद्ध झाला.

व्हिटा मारी गोल्ड, न्यूट्री चॉईस, रस्क टोस्ट, दूध, चीज स्प्रेड, ताक अशा नवनवीन उत्पादनांनी लोकांच्या मनाचा ताबा घेतला. बिस्किटे, चीज, टोस्ट, ब्रेड या पूर्वी चैनीच्या वाटणाऱ्या गोष्टी आता लोकांच्या गरजेच्या बनल्या आहेत. करोनाच्य पार्श्वभूमीवर पौष्टीकतेचा विचार करून कंपनीने मिल्क बिकिसचे नव्या स्वरुपात बाजारात आणली आहेत. त्यामुळेच दीर्घमुदतीसाठी ब्रिटानियामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.

शुक्रवारचा बंद भाव – रु.3704.90

– सुहास यादव  ([email protected])

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.