मतदानासाठी व्हीलचेअरवरच बसावे लागले तासभर

सातारा – लोकसभा पोट निवडणूक व आठ विधानसभा मतदार संघांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र तरीही अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यातच सातारा जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाच आनेवाडी (ता. जावळी) येथे व्हीलचेअर बसून तब्बल एक तास मतदानासाठी वाट पहावी लागली.

सातारा-जावळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माहिती कार्यालयामार्फत मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांची छायाचित्रे व मुलाखती संकलित करून त्याचे प्रक्षेपण झाले. पण, आनेवाडी (ता. जावळी) येथील प्राथमिक शाळा येथे दोन्ही मतदान केंद्रावर मतदारांची उस्फूर्त गर्दी पाहण्यास मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील शिपाई मुरलीधर भिकोबा शिंदे हे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आनेवाडी येथून सातारा येथे कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने त्याच्या मोटर सायकलचा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.

आज आनेवाडी येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी ते व्हील चेअर वरून आले होते. केंद्रावर मोकळ्या जागेत चिखल झाल्याने त्यांची व्हीलचेअर पुढे जाण्यासाठी मार्ग उरला नव्हता. अखेर एक तासाने त्यांना मतदान करता आले. सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खूपच हाल झाले होते. बंदोबस्त करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलातील सुरक्षा रक्षक व स्थानिक पातळीवर पोलीस दलाने कोणतीही तक्रार न करता आपले कर्तव्य पार पाडले आहे. पावसाच्या भीतीने मतदारांनी सकाळी लवकर उठून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. साताऱ्याच्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेने मतदानाचा अमाप उत्साह पहायला मिळाला. ज्येष्ठ नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडून उत्स्फूर्तपणे मतदान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.