जुन्नरमध्ये तिरंगी लढतीत विजय कोणाचा?

2014 च्या तुलनेत टक्‍का घसरला; सुमारे 63.73 टक्‍के मतदान

जुन्नर – जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत सरासरी 63.73 टक्के मतदानाची नोंद झाली असून सुमारे 1 लाख 95 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गत विधानसभेत झालेल्या 71 टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा घट झालेली आहे. हा घटलेला टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, हे येत्या 24 तारखेला स्पष्ट होणार आहे. सोमवारी (दि. 21) तालुक्‍यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले असून कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झालेली नाही.

विद्यमान आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे अतुल बेनके व अपक्ष उमेदवार आशाताई बुचके हे तीनही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती; मात्र मतदान घटल्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचे चित्र आहे. तर उत्साही कार्यकर्त्यांमध्ये आता मोठमोठ्या पैंजा लावल्या जात आहेत. गेल्या दोन दिवस पडणाऱ्या पावसाने आज उघडीप दिल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह होता; मात्र शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदान जास्त प्रमाणात झाल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात सकाळच्या पहिल्या दोन तासांत 6.27 टक्के मतदान, पुढील दोन तासांत 19.78 टक्के तर आणखी दोन तासांनी म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत हा आकडा 35 टक्क्‌यांच्या पुढे गेला होता. तर सायंकाळी सहा वाजता सुमारे 1 लाख 95 हजार मतदारांनी मतदान केले.

विजयाबाबत उत्साही कार्यकर्त्यांमध्ये आता मोठमोठ्या पैंजा

तालुक्‍यातील 356 केंद्रांवर मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र काही ठिकाणी एव्हीएम मशीन बंद पडणे, नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांचे नाव यादी न सापडणे तर काही ठिकाणी मतदान केंद्र बदलणे आदी अडचणी आल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदान केंद्राच्या जवळच गाड्या पार्क केल्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये वादविवाद झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.