पुणे(प्रतिनिधी) – एका व्हॉट्सअॅप अॅडमिनने ग्रुपमधील सदस्याला 50 हजाराचा गंडा घातला. कमी किंमतीत कपडे देत असल्याची जाहिरात करुन ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रफुल्ल चंद्रकांत दिवटे(रा.हडपसर) हे एका व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या ग्रुपच्या अॅडमिन असलेल्या व्यक्तीने ग्रुपवर कपड्यांचे मार्केटींग करुन कमी किंमतीत कपडे देण्याचे आमिष दाखवले होते. त्याने स्वत:चे नाव धर्मेश राठोड असे सांगितले होते.
यानंतर प्रफुल्ल यांच्यासोबत 69 हजार 500 रुपयांची डिल करुन त्यांना 50 हजार रुपये बॅंकेच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. यानंतर कपड्यांची डिलीव्हरी न देता त्यांची फसवणूक केली. प्रफुल्ल यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.